नांदेड जिल्ह्यातील मारोती मानेमोड हे उमलत्या उर्मीचे, उत्तुंग प्रतिभेचे दमदार गझलकार आहेत. ‘निर्गुणी आकार’ हा त्यांचा पहिला गझलसंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. या गझलकाराने झपाटलेपणाने गझलेचा हात धरला आहे. तो हात त्यांना आशयसंपन्नतेच्या शिखरावर घेऊन जातो. त्यांच्या संग्रहातील कोणत्याही गझलेतील एखादा शेर बाजूला काढून वाचला, अभ्यासला तर त्यातील आशयघनता सहजगत्या लक्षात येते. ही सखोल आशयघनताच वाचकांना मोहिनी घालते. त्यांच्या गझलेगणिक वाचक प्रभावित होत जातो. याचे मुख्य कारण म्हणजे त्यातील आशयघनता हेच आहे. केवळ गझलेची पूर्तता करण्यासाठी मानेमोड हे शेरबरायेशेर, शेरासाठी शेर अर्थात खोगीर भरतीचे शेर लिहिणे पसंत करत नाहीत. शेरातील हरेक शब्द ते घासून-पुसून तावून सुलाखून घेतात. त्यामुळे त्यांच्या गझलेत निरर्थक शब्दांना तसूभरदेखील वाव नाही. प्रत्येक शेर हा त्यांच्या जाणिवेतून-नेणिवेतून आविष्कृत होतो. गझल हा तंत्रानुगामी प्रकार असल्याने त्यात काफिये-रदीफची तंत्रशुद्ध जुळवाजुळव अपरिहार्य असते. परंतु प्रतिभेबरोबरच ज्यांची तंत्रावर मूलभूत हुकमत असते. त्याच्यासाठी अशा प्रकारची जुळवाजुळव कधीच क्लिष्ट आणि डोकेदुखी ठरत नाही. उलटपक्षी तो अधिकार नवनव्या प्रयोगशीलतेने प्रकट होत असतो. मानेमोड हे त्या कोटीतील सिद्धहस्त गझलकार आहेत.
मानेमोड यांच्या गझलेत नादसौंदर्य, तालसौंदर्य, लयसौंदर्य, भावसौंदर्य, शब्दसौंदर्य तर आहेच आहे. त्याशिवाय विषयांचे विपुल वैविध्य, मांडणीतील निखळ दृष्टिकोन अचंबित करणारा आहे. कलाटणी, अनपेक्षित धक्का देणारी नाट्यमयता यासारख्या वैशिष्ट्यांच्या तळाशी असणारी आशयघनता हा त्यांच्या गझलेचा स्वभाव, प्रभाव, स्थायीभाव असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. आशयघनता हीच त्यांच्या गझल सृजनाची सार्थकता आहे. स्वत्वातून साकारलेले हे गझलेचे एकेक भावशिल्प आहे. आशयाने ओथंबलेल्या कैक गझला त्यांच्या संग्रहात वाचावयास मिळतात. हे सृजन असे आहे की, रसिकजन याचे खचितच स्वागत करतील, कौतुक करतील याची मला पक्की खात्री आहे.
कालचे, आजचे, प्राचीन, अर्वाचीन, अध्यात्म, एकात्म, भक्ती-प्रीती, नाती-गोती, दुःखाचे फुलणे, सुखाचे मावळणे असे समग्र संदर्भ मानेमोड यांच्या गझलेतून मुखरित होतात. जे काळाचे परिणाम सोबत घेऊन येतात. हा गझलसंग्रह एकांताच्या एकाग्रतेने वाचल्यानंतर त्यातील अनेक शेर मनात दीर्घकाळ रेंगाळत राहतात. समजून घेण्याच्या, आकलनाच्या, जाणिवांच्या पातळीवर भरभरून आनंद देत राहतात. मानेमोड यांच्या लखलखत्या प्रतिभेने वाचकांच्या मनाचा कोपरानकोपरा उजळून निघतो. हे स्वयंप्रकाशी गझलकार आहेत. कोणत्याही उत्कृष्ट रचनेची ही खासियतच असते की, अभिव्यक्तीचा स्तरावर आपल्याला नेमके काय सांगायचे आहे, या विचारावर हा गझलकार सुरुवातीपासूनच स्पष्ट असल्या कारणाने तो दुर्बोध शब्दांच्या आश्रयाला जात नाही. साध्या-सुध्या प्रवाही शब्दांतून खूप काही अंत:करणाला भिडणारे सांगता येऊ शकते. हे या गझलकाराने साबित केले आहे. त्यामुळे गझल आणि रसिक यांच्यात भिंत उभी राहत नाही.
गझलेने हे जग सुंदर बनवले आहे. किमानपक्षी त्यातली कुरूपता तरी नक्कीच कमी केली आहे. गझलेने नेहमीच द्वेषाला तिलांजली देऊन निखळ माणुसकीचा उद्घोष केला आहे. सद्भाव आणि माणुसकी हे गझलेचे अलंकार आहेत. जगातल्या प्रत्येक माणसाला आपण सुंदर दिसावे असेच वाटत असते. गझलेत ही सुंदरता सामावलेली असते. सुंदर असणे ही भावनासुद्धा सुंदरतेचे निदर्शक आहे. याला गझल अपवाद नाही.
'गझलेमधुनी घडतो नक्कीच सदैव माणुस सुंदर
फुटून येतो द्वेषालाही माणुसकीचा पाझर'
नदीचे स्वच्छंद वाहणे सर्वांनाच दिसत असते. तिची घुंगरासारखी खळखळ स्पष्टपणे ऐकू येते. मात्र तिच्या आतले काहूर कोणीच ऐकत नाही. या दाटलेल्या काहुराची नदी कधीच वाच्यता करत नाही. काठावरच्या माणसाला नदी व्याकूळ करू इच्छित नाही. तिला समजून घेण्याची कुणी हाक दिलीच तर अर्ध्यावरच राहून जाते. वाहणे हाच नदीचा गुणधर्म आहे. नदी तो अनादी काळापासून पाळत आली आहे. मानेमोड यांच्या शेरातून तिची अधिक स्पष्टता लक्षात येते.
'दिल्या व्याकूळ जेव्हा मी नदीला सारख्या हाका
तिची खळखळ मला देते तिचा काहूर अर्ध्यावर'
दिव्याच्या प्रकाशाने सभोवताल प्रकाशमान होतो. परंतु त्याच्या बुडाशी गर्द अंधार पसरलेला असतो. अशा दिव्याखालच्या जागेत जन्मभर राहणे, ही साधी बाब नाही. माणूस सुख आणि शृंगार भोगण्यासाठी सदैव उत्सुक असतो. परंतु अंधार भोगण्याची तो कल्पनासुद्धा करू शकत नाही. माणूस हा मूलतः उजेडाचा पूजक आहे. अशा पार्श्वभूमीवर अंधारयात्री होऊन अंधाराला भोगत अवघा जन्म काढणे याकरिता खडकर साधना लागते. मानेमोड हे दिव्याखालच्या जागेचे साधक आहेत.
'मी दिव्या खालच्या जागेत राहिलो
जन्मभर फक्त मी अंधार भोगला'
विजयोत्सव साजरा करण्यासाठी गुलाल उधळण्यात येतो. त्यात जिंकण्याची झिंग असते. मात्र नंतर हाच गुलाल पायदळी तुडवला जातो. तो क्षणभंगुर ठरतो. याचे विजेत्यालाही सोयरसुतक नसते. माणसाच्या जिंदगीची कथाही याहून वेगळी नसते. गुलालाप्रमाणेच माणसाला जिंदगी उधळून द्यावी लागते. आणि सरते शेवटी गुलालानेच जगाचा निरोप घ्यावा लागतो. हे वास्तव कुणालाही नाकारता येऊ शकत नाही. गुलालाबरोबरच माणसाच्या जिंदगीतील खिन्नताही या शेरातून प्रत्ययकारी शब्दांतून प्रकट होत जाते.
'ही गुलालाच्या कथेची जिंदगी
सारखी चोहीकडे उधळव पुन्हा'
गझलकाराचे मन गर्दीत असते. तो कधीच एकटा नसतो. तो जरी बाहेरून एकटा वाटत असला तरी तो आतल्या गर्दीत मिसळलेला असतो. ही आत उसळलेली गर्दीच त्याला बाहेर पडू देत नाही. आतल्याआत त्याची समाधी लागलेली असते. मनात गर्दी त्याला सारखी बेचैन करत असते. या गर्दीतल्या सुखदुःखाला शेरात ओवून तो गझल रसिकांसमोर ठेवतो. गर्दीतल्या सुखदुःखाचे भाषांतर म्हणजेच तर गझल असते. या गर्दीशीच गझलकाराची बांधिलकी असते. म्हणून त्याला आतली गर्दी सोडून बाहेर येता येत नाही. गझलकाराचे हेच तर सांगणे आहे.
'स्वतःच्या आतल्या गर्दीत मी
कुठे बाहेर बोलवता मला'
आईमुळेच तर घराला घरपण लाभते. आईच्या अस्तित्वाने घराला राऊळाचे स्वरूप प्राप्त होते. हे खरे असले तरी घराची कळा अंगण सांगते असे म्हणतात. हेही नाकारता येत नाही. ज्या घरात पोरगी असते. त्या घराची शोभा उठून दिसते. आई घरपण जपते तर पोरगी अंगणाची शोभा वाढवते. दोघींच्या असण्याने घरअंगण शोभिवंत होऊन जाते. एकाच शेरात मानेमोड यांनी आई आणि पोरगी दोघींचेही अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित केले आहे. सगळ्यांच्याच दृष्टीने हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. स्त्रीभ्रूणहत्येच्या पार्श्वभूमीवर आरसा दाखवणारी ही नितांत सुंदर गझल आहे. त्यातला शेर पाहा.
'माय आणते घरास घरपण
अंगणातला सडा पोरगी'
विविध विषयांबरोबर आध्यात्मिक डूब असलेले ते अनेक शेर मानेमोड यांनी लिहिलेले आहेत. तुळजापूर सारख्या तालुक्याच्या ठिकाणाहून ‘निर्गुणी आकार’ हा दर्जेदार आणि देखणा गझलसंग्रह काढण्यात आला आहे. हे विशेष उल्लेखनीय आहे.
....................................................
निर्गुणी आकार: गझलसंग्रह
गझलकार: मारोती मानेमोड
समग्र प्रकाशन, तुळजापूर
पृष्ठे: १२१ मूल्य: २३०₹
....................................................
बदीऊज्जमा बिराजदार
(साबिर सोलापुरी)
भ्रमणध्वनी:9890171703
.................................
