Showing posts with label जयराम धोंगडे. Show all posts
Showing posts with label जयराम धोंगडे. Show all posts

तीन गझला : जयराम धोंगडे

 




१.


जमाव जेव्हा स्वार्थासाठी गोळा होतो

नीती-मूल्यांचा पालापाचोळा होतो


राबराबती मायबाप ज्या पोरांसाठी 

त्याच मुलांचा तिकडे कानाडोळा होतो


केले काय असे ते सांगा आम्हांसाठी

या प्रश्नाने मेंदू चोळामोळा होतो


कोंब कोवळे सडविण्यास तो कोसळल्यावर

आडमुठा पाऊस शेवटी भोळा होतो


कष्टाने खांदे झिजल्यावर मिळतो चारा

वर्षात एकदा स्नेहाचा पोळा होतो


भले असू द्या हुशार कोणी गरिबाघरचा

मार्ग यशाचा अखेरीस चिंचोळा होतो


सुखदुःखाच्या प्रवाहात मी पोहतोच पण

कधी ताठ तर कधी देह वाटोळा होतो


२.


माकडाचे माणूस झालो बाटाबाटी उगा कशाला?

जातपात-धर्मापंथाच्या वाटाघाटी उगा कशाला?


तोच म्हणाला स्वर्गामध्ये गाठी पडती दोन जिवाच्या

सोयरिकीच्या श्रेयाची मग लाटालाटी उगा कशाला?


ज्यांनी नाही कधी लावले एक रोपटे दुसऱ्यांसाठी

स्वतःसाठी झाडांची त्या छाटाछाटी उगा कशाला?


पूर्णब्रह्म त्या अन्नासाठी बसून पंगत जेवायाची

अता उभ्याने खाण्यासाठी दाटीवाटी उगा कशाला?


मतभेदाचे बी रुजल्यावर मनभेदाचे रोप वाढते

संवादाने टिकवू नाते फाटाफाटी उगा कशाला?


३.


चांगुलपणास नाही काही प्रमाण मित्रा

साऱ्याच संकटावर तू रामबाण मित्रा!


मी संभ्रमात पडता तू सांगतोस गीता

युद्धात जीवनाच्या भरतोस त्राण मित्रा!


रक्तापल्याड नाते, नात्यापल्याड आस्था

जगण्यात येत जाते केवळ उधाण मित्रा!


मी जीव लावण्याचा वाखाणतो उमाळा

घेतो निरोप आता करतो प्रयाण मित्रा!


देऊ नकोस खांदा माझ्या कलेवराला

पुन्हा कुडीत माझा येईल प्राण मित्रा!


...................................................