१.
असावी रात्र एखादी जिवाच्या आत माझ्या
जळत आहेत स्वप्नांचे दिवे डोळ्यात माझ्या
मला नाचायचे नाहीच तालावर कुणाच्या
उगाचच घुंगरू बांधू नका पायात माझ्या
मनाचे आजही या मोकळे आकाश होते
स्मृतींची पाखरे जेव्हा जवळ येतात माझ्या
जमू शकणार रोपांना अता मातीत रुजणे
नभाने कार्यशाळा घेतली शेतात माझ्या
फरक नाही पडत एखादि इच्छा मारल्याने
अशा कित्येक इच्छा मारल्या गेल्यात माझ्या
फुलांचा वारसा घेउन गझल आली असावी
सुगंधी शेर हल्ली भोवती फिरतात माझ्या
बिघडते मन तुझे माझ्याबरोबर राहिल्याने
तरी का राहतो आहेस सानिध्यात माझ्या
२.
कोण म्हणतो की शहाण्यासारखा फिरतो
जन्मभर माणूस वेड्यासारखा फिरतो
कारखाना काळजाचा बंद पडल्यावर
जीव हा बेरोजगारासारखा फिरतो
एक मुलगा कामधंदा शोधतो आहे
एक मुलगा काम नसल्यासारखा फिरतो
कावला आहेस तू बहुतेक जन्माला
त्यामुळे वैताग आल्यासारखा फिरतो
रात्रभर तुमच्या मशाली पेटत्या ठेवा
मी उभ्या विश्वात सूर्यासारखा फिरतो
बाप इकडे साफ करतो शासकी मोऱ्या
आणि मुलगा आमदारासारखा फिरतो
दाखला श्रीमंत असण्याचा जवळ माझ्या
मात्र मी येथे फकीरासारखा फिरतो
३.
थापली भाकर तिने पाहून चंद्राला
आणले ताटामधे वाढून चंद्राला
राहुलाही कोणत्या लागू नये पत्ता
ठेवल्यावरती तिने लपवून चंद्राला
बांधली राखी कुठे..चंद्रास आईने?
आठवे 'मामा' मला पाहून चंद्राला
अंबराशी घट्ट नाते जोडले गेले
तू जशी आलीस ओवाळून चंद्राला
मोगरा जळतो अता पाहून चंद्राला
घेतले आहेस का माळून चंद्राला?
काय सोने लागले मुखड्यास चंद्राच्या
पाहतो आहेस तू निरखून चंद्राला
बांधतो आहे तुझ्याशी गाठ जन्माची
घे भले साक्षीस या ठेवून चंद्राला
यामुळे सारे तुला भोळा म्हणत होते
तू शिरावर घेतले बसवून चंद्राला
....................................................
सतिश गुलाबसिंग मालवे
मुऱ्हा देवी (अमरावती)
हमु. शिक्रापूर , पुणे
मो. ९५२७९१२६२५