Showing posts with label गजानन वाघमारे. Show all posts
Showing posts with label गजानन वाघमारे. Show all posts

तीन गझला : गजानन वाघमारे

 




१.


गरज इतक्यात अश्रूंची पडत नाही

कुणी मेला तरी कोणी रडत नाही


उतरली शेवटी नजरेतुनी दारू

चढावी वाटते...साली चढत नाही


उन्हाने शोधमोहिम घेतली हाती

तरीही सावली का सापडत नाही


किती हा अंगवळणी पिंजरा पडला

दिले सोडून पण पोपट उडत नाही


व्यथांचा छान मोहरतो ऋतू माझ्या

फुलोरा जीर्ण जखमांचा झडत नाही


गुरांच्यासारखा कळपात वावरतो

इथे माणूस होणे परवडत नाही


तुझ्या मांडीवरी मी जीव सोडावा

असे मरणे कुणाला आवडत नाही ?


२.


कुठवर उपासमारी लोकांस छान सांगू

मी का बरे उन्हाला माझी तहान सांगू


जात्यांध लोक झाले, धर्मांध देश झाला

मी कोणत्या मुखाने भारत महान सांगू


विद्रोह आतड्यांचा रस्त्यावरी उतरला

आता नको भुकेला पोथी-पुराण सांगू


पायात वादळाला बांधून रोज फिरतो

मी कोणते तुम्हाला माझे ठिकाण सांगू 


हे धर्मग्रंथ मित्रा बांधून ठेव सारे

या आंधळ्या पिढ्यांना चल संविधान सांगू


रक्तात भीम माझ्या, हृदयामधे शिवाजी

याहून श्रेष्ठ कुठली मी खानदान सांगू?


गझले तुझी नि माझी आहे जबाबदारी

अन्याय होत आहे, तो तर किमान सांगू


३.


पोरगा नालायकी घेऊन फिरतो

बाप त्याची काळजी घेऊन फिरतो


सावलीचे पाय मी धरलेच नाहित

मी उन्हाची काहिली घेऊन फिरतो


फोडण्यासाठी फुगा हा संभ्रमाचा

वास्तवाची टाचणी घेऊन फिरतो


आपली शोकांतिका मी फार जपली

ती कहाणी आजही घेऊन फिरतो


काजव्यांना आग खाली लगलेली

चंद्र त्याची चांदणी घेऊन फिरतो


कार्यकर्त्यांना कुणी समजून सांगा

चोरट्यांची पालखी घेऊन फिरतो


सारखे शुद्धीमधे आयुष्य छळते

त्यामुळे मी बाटली घेऊन फिरतो


मी विसंबुन राहिलो नाही कुणावर

मी स्वतःची लायकी घेऊन फिरतो


....................................................

गजानन वाघमारे

कष्टसाध्य निवास,

सराफा लेन,

मु.पो.ता.महागाव 

जि. यवतमाळ