Showing posts with label अविनाश येलकर. Show all posts
Showing posts with label अविनाश येलकर. Show all posts

तीन गझला : अविनाश येलकर

 



१.


काठावरल्या वाऱ्याची लय गझल म्हणू का ?

पाण्यावर थेंबांची थयथय गझल म्हणू का ?


तुटून जेव्हा अलगद खाली गळून पडते 

मी त्या पिवळ्या पानाचे वय गझल म्हणू का ?


दूर जरासे निघून जाता पाडस अपुले

डोळ्यांमधले हरिणीच्या भय गझल म्हणू का ?


बऱ्याच दिवसांनी भिडलेली नजर आमची

त्यात सरींचा भिजरा व्यत्यय गझल म्हणू का ?


ओठांवर जो आजवर कधी आला नाही

मनात गुदमरलेला आशय गझल म्हणू का ?


तिचे लाजणे, काजळ, टिकली, झुमके, गजरा

अन् गालावर बटांचा विषय गझल म्हणू का ?


एकेका श्वासाचे अत्तर अत्तर करते

दरवळण्याची फुलांची सवय गझल म्हणू का ?


मला चित्रपट वाटत आहे जीवन अपुले

त्यात तुझा अन् माझा अभिनय गझल म्हणू का ?


२.


वाट पाहत पावसाची मीच आभाळून गेलो

सारखे पाहून अंबर मी निळा होऊन गेलो


भेटल्यावर ती म्हणाली बोल काही बोल काही

शब्दही ना काढला मी आसवे ढाळून गेलो


पारदर्शक राहण्याची चांगली शिक्षा मिळाली

काच मी होतो, दिवा ती, शेवटी तडकून गेलो


बंद केल्या पापण्या ह्या पाहण्यासाठी तिला मी

तेवढ्यापुरता मनाने मी तिच्या जवळून गेलो


पैलतीरावर नदीच्या वेदनेचे गाव आहे

ती तिथे राहून गेली मी पुढे वाहून गेलो


शांत पाण्यासारखी होती समाधी लागली पण

पाहण्यासाठी वलय माझे मला बुडवून गेलो


३.


चमकते ठेव आकाशात चंद्राला 

कशाला फेकतो कचऱ्यात चंद्राला 


चमकत्या चांदण्यांचा पिंजरा करुनी 

खुबीने ठेवले जाळ्यात चंद्राला


घराची वाट तुडवत एकटी बाई

निघाली घेउनी पदरात चंद्राला 


तिच्या दारात विधवा खिन्न बसलेली 

जवळ घेवून ती दुःखात चंद्राला 


नको येऊस तू खिडकीमधे रात्री 

जळू दे आज आकाशात चंद्राला 


...................................................