Showing posts with label पंकजकुमार ठोंबरे. Show all posts
Showing posts with label पंकजकुमार ठोंबरे. Show all posts

तीन गझला : पंकजकुमार ठोंबरे

 




१.

प्रश्न होता भाकरीचा वादळांची काय पर्वा
नाविकाला सागराच्या गर्जनांची काय पर्वा

तोडले नाते जगाने संकटांनी वेढलो मी
मी गुलाबी फूल झालो कंटकांची काय पर्वा

लाख झाले वार माझ्या भावनांवर विस्तवाचे
ऐरणीच्या मस्तकाला वेदनांची काय पर्वा

वाळवंटाच्या उन्हाने बहरले आयुष्य माझे
घामधारांनी नहालो सावल्यांची काय पर्वा

जीवनाच्या शर्यतीला जिंकण्याचे ध्येय आहे
कासवाची चाल माझी मग सशांची काय पर्वा

२.

हजारोने बळी गेले तुझ्या रागात नाही का
उडाली राख स्वप्नांची तुझ्या स्फोटात नाही का

कसे पेटून गेले प्रेमही आगीत देशांच्या
निघाले प्रेत प्रीतीचे तुझ्या द्वेषात नाही का

मुलांनाही कसे सांगू अता मी पाठ शांतीचे
इथे आयुष्य ताऱ्यांचे काळोखात नाही का

स्मशानासारखे  झाले अता आयुष्य माझे हे
पिढीही खाक झाली रे अणूयुद्धात नाही का

कुठे बर्फात जाऊ मी मनाच्या शांततेसाठी
मलाही घाल ना गोळी इथे डोक्यात नाही का

विमानाने कसा फेकून गेला बॉम्बगोळ्याला
इथे माणूस  आहे तो तुझ्या देशात नाही का

असा घेऊन प्राणांना कसा जिंकून हसतो तू
जरासा थेंब अश्रूचा तुझ्या डोळ्यात नाही का

३.

किती काळीज हळहळते सखी पाऊस आल्यावर
तुझ्या विरहात मन रडते सखी पाऊस आल्यावर

कसा मी सावरू आता तुझ्याविन तोल माझा मी
गडे पाऊल गडबडते सखी पाऊस आल्यावर

भडकते आग हृदयाची कशी पाण्यात भिजताना
हवेने अंग थरथरते सखी पाऊस आल्यावर

मृगाच्या पावसासोबत जुळे माझीतुझी प्रीती
अचानक वीज कडकडते सखी पाऊस आल्यावर

निरोपाच्या सरी घेऊन मी पाऊस पाठवतो
तुझी मज आठवण छळते सखी पाऊस आल्यावर

विसरलो मी तुला राणी विसरलो सर्व काही पण
मला ती भेट आठवते सखी पाऊस आल्यावर


...................................................
पंकजकुमार उत्तम ठोंबरे
कोंडोली ता.मानोरा वाशिम
9503717255