Showing posts with label सरिता प्रशांत गोखले. Show all posts
Showing posts with label सरिता प्रशांत गोखले. Show all posts

तीन गझला : सरिता प्रशांत गोखले

 



१.


आयुष्याच्या संध्याकाळी टकटक झाली दारावरती

आठवणींची सुरीच जणु की फिरून गेली माझ्यावरती


तू असताना  गरजच नव्हती मला कुणाच्या आधाराची

कुणास आई म्हणून बोलू धडपडताना रस्त्यावरती


जीर्ण शाल ही आयुष्याची पुरे न दुःखे झाकायाला

व्यथेस केले सखी जिवाची  गाठ अचानक पडल्यावरती


शोध स्वतःला पुन्हा नव्याने दिशा मनाच्या सांगुन गेल्या 

चुटकी सरशी मला भेटले मैत्र  मनाशी जुळल्यावरती


पुरे जाहले इथवर जगणे विचार येतो मनी कैकदा

उरली नाही मनात इच्छा आता कुठल्या जन्मावरती


२.


जीवघेण्या जीवनाला जिंकण्याचा ध्यास नाही 

प्राक्तनाचा या जगावर राहिला विश्वास नाही 


वादळाने घात केले त्या कळीवर उमलताना

तू दिलेल्या मोगऱ्याला श्वास होते वास नाही


वादळाचा हात हाती घेतला मी चालताना

दुःखही मग जात आता कोणत्या वाट्यास नाही 


सांग देवा पांडुरंगा काय चुकले लेकराचे 

या मनाला त्या मनाची राहिली का आस नाही 


टाकले मी दुःख मागे तृप्त आहे जीवनीही

श्वास घेते मी सुखाचा ठेवला दुस्वास नाही


३.


संकटातही पुढे सरकणे जमते आहे जरा जरा

दुःख,वेदना हसत सोसणे जमते आहे जरा जरा


मने जिंकली तडजोडीने अल्लडशा त्या वयामधे 

फूल होउनी शब्द झेलणे जमते आहे जरा जरा


लळा जिव्हाळा लावत गेले पाझर फुटला ममतेला

संस्काराची झोळी भरणे जमते आहे जरा जरा 


कुठे बिघडले सांग नियंत्या नशीब माझे फिरले तर

मुक्त मनाने जीवन जगणे जमते आहे जरा जरा


चाळीशीच्या उंबरठ्यावर नकळत आहे उभी जरी

वयास हरवुन नभास भिडणे जमते आहे जरा जरा


रंग विखुरले नात्यांमधले प्रपंच साधा करताना

रुसवा-फुगवा सहज विसरणे जमते आहे जरा जरा


.............................................

सरिता प्रशांत गोखले

रत्नागिरी