१.
तिच्या डोळ्यांमधे दिसली जशी वणवण
फुले कोमेजली आक्रोशले अंगण
कुणी आजन्म माझ्या मारल्या इच्छा
मला असतो विचारत मीच निष्कारण
कसे नाही कुणी म्हणणार साधारण
असाधारण म्हणाया पाहिजे कारण
विकत मी घेतले आहे जुने घरटे
जुन्या भिंती, जुने छप्पर, नवे घरपण
म्हणाला काम करतो मी तुझे नक्की
पुढे हळुवार त्याने लावला मग 'पण'
कुणी ह्या अडचणींनाही जरा सांगा
तिचे सुख ठेवले आहे तिने तारण
२.
असा लागला शोध माझा मला
म्हणू लागलो मीच काटा मला
तिच्या बोलक्या दोन डोळ्यांमधे
बुडू लागलो यार काढा मला
तिला ज्यात माझी हवी सावली
हवा नेमका तो उन्हाळा मला
कसा काय होणार सर सांग ना
तिच्या लालसेचा पन्हाळा मला
कुणाला कसा काय मिळणार मी
कुणी शोधले का तळाला मला?
सजवणार आहात भाळावरी?
हवे तेवढे मग उगाळा मला
किती चांगला जन्म जाईल हा
कुणी आपला जर म्हणाला मला
३.
भूतकाळ डोळ्यांत दाटला आहे
काळ पुढे येऊन थांबला आहे
नजर बरी होणार कधीही नाही
काटा जर डोक्यात मोडला आहे
नशिबाचा अंधार मिटवण्यासाठी
दिवा पुन्हा पाण्यात सोडला आहे
एका दुःखाला संपवण्यासाठी
दुसऱ्याचा आधार घेतला आहे
आठवणींना मुहूर्त बिहिर्त नसतो
तो तर चाळा फक्त आपला आहे
एका क्षणात इच्छा मरून गेली
घासामध्ये खडा लागला आहे
जीव सावलीवरती आहे माझा
म्हणुन उन्हाला लळा लावला आहे
मी जन्माची इच्छा केली नव्हती
मृत्यूचाही मोह टाळला आहे
नको हात फिरवूस तुझ्या केसांवर
गजरा मी स्वप्नात माळला आहे
हिमालयातुन सुद्धा येतिल भुंगे
सुगंध इतका दूर पोचला आहे
...................................................