Showing posts with label निलेश कवडे. Show all posts
Showing posts with label निलेश कवडे. Show all posts

तीन गझला : निलेश कवडे

 




१.


डोळे पाणावले कसे जो तो विचारतो

मला आजही तुझ्यामुळे जो तो विचारतो


कथा कधीही अधुरी राहू नये कुणाची 

पुढे काय झाले त्यांचे जो तो विचारतो


धर्म, जात वा रंग वगैरे काही नसतो 

पैसेवाल्यांला येथे जो तो विचारतो


स्वतःच खोटे असल्याची कबुली देताना

कोण राहिले खरेखुरे जो तो विचारतो


दखल स्वतःची कधी घेतलीपण नसती मी

गझले! मजला तुझ्यामुळे जो तो विचारतो


दुःखाचा घेऊन आरसा बसलो होतो

तुला काय झाले आहे जो तो विचारतो


२.


तुझ्या पापण्यांच्या समुद्रात रात्री

मिसळतो नदी होउनी त्यात रात्री


इथे मीच नाही बघत रात्रभर छत

इथे कोण नसतो तणावात रात्री


तुझ्याशी असे राहिले फक्त नाते

जसा चंद्र असतो तलावात रात्री


पुन्हा आज तुटणार गगनात तारा

पुन्हा स्वप्न बुडणार डोळ्यात रात्री

 

म्हणुन दाटतो रोज अंधार तेथे

चिता ऊब देते स्मशानात रात्री 


चुकीने निवडला तिने 'हात' त्याचा

अता जागते ह्या विचारात रात्री


तिला हे कुणीही विचारू नये की

तिला कोण दिसतोय चंद्रात रात्री


३.


फार छळतो उशीर डोळ्यांना

काय सांगू अधीर डोळ्यांना


एवढीही चमक बरी नसते

गाठतो मग तिमीर डोळ्यांना


वय वगैरे तिचे दिसत नसते

फक्त दिसते शरीर डोळ्यांना


रोज रात्री सतावते चिंता

झोप नसते अमीर डोळ्यांना


एकदा मनभरून पाहू दे 

मी बनवले फकीर डोळ्यांना


वाट गंधाळुनी दिशा देतो

विठ्ठलाचा अबीर डोळयांना


पावसाचा विचारते पत्ता

आटलेली विहीर डोळ्यांना 

...................................................