१.
आपत्तींशी लढता लढता जीवन माझे कणखर झाले,
दु:खांचेही बघता बघता छान सुगंधित अत्तर झाले.
आयुष्याच्या वळणावरती वात्सल्याची छाया दिसली,
अंगाऱ्यांच्या उष्ण पथावर शीतलतेचे अंबर झाले.
नको मिठाई,नकोत मेवे, हवी भाकरी जगण्यासाठी,
तिखट-मीठ अन् भाकर-तुकडा, जेवण माझे रुचकर झाले.
धूसर दृष्टी झाली माझी, द्वेषाचा कण कसा अडकला?
नेत्र उघडले गुरुवर्यांनी, वाट चालणे सुखकर झाले.
शुष्क तरूला फुटली पाने, पल्लवीत मन झाले होते,
अंतरात मग पाझर फुटला, विचार सारे निर्झर झाले.
२.
लोक धावती, गर्दी करती, पळतो आम्ही,
दिशाहीन मग खड्ड्यांमध्ये पडतो आम्ही.
इतरांसाठी वेळ काढणे काम न अमुचे,
मात्र अपेक्षा त्यांचेकडुनी करतो आम्ही.
प्रेम असो वा ऋण कैकांचे विसरत जातो ,
अहंपणाला मनापासुनी जपतो आम्ही.
दुखवून कुणा द्रव्यासाठी थकवत जातो,
भरताना धन तिजोरीत ना थकतो आम्ही.
होतकरूंच्या कष्टांची ना किंमत करतो,
भलेपणाचा आव आणुनी बघतो आम्ही.
३.
आभास,मोह,माया छळती जरी मनाला
भारावले सख्या मी कोठून त्या क्षणाला
कोषात भावनांच्या अडकून मीच जाते
होतोस मोकळा तू मोडून बंधनाला
स्पप्नात रोज माझ्या स्पर्शून कोण जातो
येतो सुगंध कुठुनी माझ्याच स्पंदनाला
तारीफ पुष्पमाळा ह्यांच्यात सौख्य ज्याचे
मन अन्य माणसाचे समजेल तो कशाला
शब्दात सत्य नाही, वचनात सार नाही
आश्वासने कशी मग देती फुका जनाला
....................................................
सौ.सुषमा राम वडाळकर,
वडोदरा