Showing posts with label सोपान डोके. Show all posts
Showing posts with label सोपान डोके. Show all posts

तीन गझला : सोपान डोके

 




१.


भेटणे आता तिला मी टाळतो आहे

पण गुलाबी आठवण सांभाळतो आहे


ज्या ठिकाणी एकदा तू भेटली होती 

जीव तेथे आणखी रेंगाळतो आहे


सोबतीने मोगऱ्याच्या बहरली जाई

सोनचाफा हा कशाने वाळतो आहे?


कोण आहे  मेनका की अप्सरा, रंभा 

एवढे मी का तिला  न्याहाळतो आहे


टाळते ती नेहमी दिवसा जरी मित्रा 

मात्र स्वप्नी रोज मी कवटाळतो आहे


२.


कर्मठांनी वाहिले ते भार ज्ञानाचे

खोलले साऊ,फुलेंनी दार ज्ञानाचे


धर्म, जाती निर्मिल्या या माणसाने

मांडले हे जोतिबांनी सार ज्ञानाचे


धर्म, जाती भेद केले  पोट भरण्या

बंद केले  वंचिता आगार ज्ञानाचे


न्याय, समता, बंधुता अन् एकताही

हेच होते  माणसा आधार ज्ञानाचे


बोललेले  कार्य  नेले  ते  तडीला

मांडले ना शब्द नुसते चार ज्ञानाचे


३.


गोडगुलाबी कळी पाहिजे

गालावरती  खळी पाहिजे


झोपतो कसा, पोहतो कसा

झाले मासा  जळी पाहिजे


उगा सांगून  काय  फायदा

गोष्ट उतरली गळी पाहिजे


नसावी चारचौघीवाणी 

ती थोडी  वेगळी पाहिजे


किती बंधने घालतो तिला

नार जरा मोकळी पाहिजे


एक  मागणे  आभाळाला

सुखी राहिला बळी पाहिजे


मला फुलाची कुठे अपेक्षा

एखादी  पाकळी  पाहिजे


....................................................

सोपान डोके,

रामपुरीकर