Showing posts with label तुकाराम कांबळे. Show all posts
Showing posts with label तुकाराम कांबळे. Show all posts

तीन गझला : तुकाराम कांबळे

 



१.


सांगून ठेवतो की, वारीस ने विठोबा

माझे लचांड सगळे ,सारून घे विठोबा


त्या सावळ्या रुपाने, डोळे दिपून जावे, 

सौंदर्य सावळे तू दाखव तुझे विठोबा


या शेत पेरणीची, औषध फवारणीची, 

झंझट नकोच काही, पाहून घे विठोबा


नामा तुला भरवला, तू भेटला जनीला, 

अमुच्या समोर केव्हा, येशील रे विठोबा


वारी करू तुझी की, या लेकरास जगवू 

मी काय तर करू हे, सांगून दे विठोबा


मी भक्त रे तुझा अन् , तू देव फक्त माझा

हाकेस आज माझ्या, धावून ये विठोबा


२.


कर बंद पापण्या तू,देहात या समेटू

घेऊन ती उसासा म्हणते असेच भेटू


हातात हात दे ना का लाजतोस वेड्या

कालावधीत थोड्या लागेल देह पेटू


चुंबून घे कपाळी वाट्टेल तेच कर पण

होईल घात इतका जास्ती नकोस खेटू


सोसेल का दुरावा गेलास दूर तर तू

मी एकटीच कारे दु:खास या लपेटू


जोडी हसीखुशीने जाईल शेवटाला

कलत्या वयातलाही संसार छान रेटू

             

३.


ज्यामुळे पावित्र्य या विश्वात आहे 

तेच नाते आपल्या दोघात आहे


माप जे ओलांडले माझ्या घराचे 

तो तुझ्या पण उंबरा लक्षात आहे


रुक्मिणी होउन मलाही भाळली तू 

कृष्ण होउन मी तुझ्या हृदयात आहे


सूर तालाची जणू ही लय मिळाली 

मन सुखाचे छान गाणे गात आहे 


साथ राहो फक्त दोघाची जिवनभर

मग किती आनंद या जगण्यात आहे 


हे सुने जगणे तुझ्यावाचून माझे 

रात्र अंधारी तुझ्या पश्चात आहे


..................................................

@k.tukaram 

तुकाराम धोंडोपंत कांबळे