१.
जे तुझे नव्हतेच ते घ्यावे कशाला माणसा
पाखरांच्या मालकीचे प्रांत केले खालसा
फक्त पारा लावल्याने होत नाही आरसा
काच म्हणते हा विचारच होत नाही फारसा
मागचे सांगून गेले तेच आम्ही मानतो
'ह्या निसर्गाला जपावे' का विसरलो वारसा?
लाभले गुणधर्म न्यारे ते हिरे बनलेत पण
दोष की दुर्भाग्य त्याचे राहिला जो कोळसा
बी-बियाणे कौतुकाने पाहते मी नेहमी
हा निसर्गानेच जपला केवढा मोठा वसा
जन्मल्यापासून ज्याच्या सोबतीने चाललो
त्याच श्वासांचा कुणीही देत नाही भरवसा
सोबतीला सूज्ञ असता काळजी मी का करू?
तू बघत जा ना सुनंदा मार्गदर्शक कवडसा
२.
जरी संसार अडकवतो तरी पांथस्थ आहे मी
मनाच्या खोल डोहाशी खरी अस्वस्थ आहे मी
जिथे ह्या बेभरवश्याच्या च श्वासाची मला सोबत
तिथे कुठल्या इराद्याने अशी मार्गस्थ आहे मी?
बियाणे तर निसर्गाचे, मशागत फक्त मी केली
फुले देण्या तुझ्याहाती इथे मध्यस्थ आहे मी
अचानक भेटते अवचित पुन्हा कोठे गडप होते
मनाच्या आत दडणारी अशी दूरस्थ आहे मी
कुणाला दोष का देऊ नसे शत्रू कुणी माझा
न दिसणारी अशी शत्रू खरी अंतस्थ आहे मी
नको व्यत्यय तुझासुद्धा कसे सांगू मनाला मी
मला एकांत लाभू दे अता ध्यानस्थ आहे मी
सुटेना कोष आत्म्याचा इथे कायम मला शिक्षा
कुण्या देहात मुक्कामी सदा कोषस्थ आहे मी !
३.
निश्चयाच्या अंकुशाने ठेवला काबूत आहे
जीवना तू मत्त हत्ती...मी कुशल माहूत आहे
का तुझाही हट्ट इतका की भविष्यालाच पाहू
वर्तमानाला पहाना जो उद्याचा भूत आहे
तू शहाण्यांच्याप्रमाणे आजही पण हे पहा की
जायचे ते दूssर गेले जे अता शाबूत आहे
वादळे भूकंप दुष्काळामुळे हैराण आम्ही
बांधतो आम्ही घराचे स्वप्न जे वाळूत आहे !
काळ येतोही बिकट पण तो कुठे थांबून असतो
कवळलेले दुःख कायम का बरे बाहूत आहे?
लाख इच्छांचाच माझ्या मी खुशीने उंट केला
मी स्वतःबाहेर माझ्या उंट तो तंबूत आहे
सौख्य आणिक दुःखसुद्धा तू सुनंदा घेत जाना
जीवनाचे सत्य दर्शन दोन ह्या बाजूत आहे
.................................
सौ.सुनंदा सुहास भावसार
नंदुरबार
90963 49241