Showing posts with label राजेश देवाळकर. Show all posts
Showing posts with label राजेश देवाळकर. Show all posts

तीन गझला : राजेश देवाळकर

 


१.


मनास रोज भावते तुझे हसू जरा जरा

जिवात जीव आणते तुझे हसू जरा जरा


मनातले खरे कधी जरी न बोललीस तू

गुपीत सर्व सांगते तुझे हसू जरा जरा


कशास तू नभात या उगाच चंद्र पाहते

तयास वेड लावते तुझे हसू जरा जरा


नकार मज दिला तरी तुझ्या मनास जाणतो

मलाच रोज शोधते तुझे हसू जरा जरा


कधीच संपले म्हणे ऋणानुबंध सर्व तर

कशास वाट पाहते तुझे हसू जरा जरा


कितीक सावरू सखे मनास माझियाच मी

जिवास खूप जाळते तुझे हसू जरा जरा


२.


जगावयाला दिवस उगा मी ढकलत नाही

मी जगताना  क्षण उरलेले  मोजत नाही


जिवंत आहे तोवर असते नाते सगळे 

मेल्यावरती याद कुणीही काढत नाही


ताटामधली चटणी भाकर खुशाल खातो

हात उगा मी कुणासमोरी पसरत नाही


डोळ्यामधले अश्रूही मी पिऊन घेतो

फुक्या सांत्वना घाव जगाला दावत नाही


जे आहे माझ्या चर्येवर लिहिले आहे

जगासारखे नित्य मुखवटे लावत  नाही


गोड बोलुनी स्वार्थासाठी फसवा फसवी

कला जगाची हीच मला हो अवगत नाही


जे आहे त्यामध्येच मी तर सुखात जगतो

हात रिकामा कुणासमोरी पसरत नाही


शब्दावाचुन तुला विठ्ठला सारे कळते

थांग मनाचा तुला कसा या लागत नाही


३.


कळली मलाच नव्हती ही जात माणसांची

शोधत उगाच  बसलो औकात माणसांची


भगवे निळे नि हिरवे जत्थेच  भोवताली

गेली जमात वाटुन रंगात   माणसांची


हिंदू असो कि मुस्लिम सारेच यार माझे

मी नाळ जोडली या हृदयात माणसांची


कोणासही जरासे देशास  प्रेम नाही

ही जात पोहते या रक्तात  माणसांची


गद्दार लोक जेव्हा देशा  विकून खाती

काढाच धिंड ही या रस्त्यात माणसांची


नाही दिला कुणी जर आधार या बळीला

प्रेते दिसतिल नुसती  शेतात   माणसांची


सद्गुण इमानदारी तू शोधतो कशाला?

ऐसी जमात दिसते स्वप्नात  माणसांची


सारेच आप्त प्रेमळ समजू नको असे तू

होते कुचंबनाही नात्यात माणसांची


....................................................