Showing posts with label हिन्दी आणि उर्दू गझल : डॉ.संगीता म्हसकर. Show all posts
Showing posts with label हिन्दी आणि उर्दू गझल : डॉ.संगीता म्हसकर. Show all posts

हिन्दी आणि उर्दू गझल : डॉ.संगीता म्हसकर

 




हिंदी गझल 


गझलच्या लोकप्रियतेच्या युगाची, खऱ्या अर्थाने सुरुवात झाली ,ती उर्दू गझलपासून.

 तसं पाहिलं तर,उर्दू गझलचा जन्म होण्याच्या कितीतरी आधीपासून, हिंदी साहित्यात गझल महत्त्वपूर्ण ठरली होती. प्राचीन काळापासून हिंदी साहित्यात गझलेची तत्त्वे आढळून येतात, असे मत हिंदी साहित्याचे जाणकार व्यक्त करतात.   अमीर खुसरोंनी लिहिलेल्या काही गझलांमध्ये, फारसी आणि हिंदी यांचे सुरेख मिश्रण होते.

 यातूनच पुढच्या काळात, हिंदी गझलची परंपरा सुरू झाली. एवढंच नाही तर ती पुढे समृद्ध होत गेली.

संत कबीर, यांनी सर्वसामान्य लोकांच्या रोजच्या भाषेत काही अशा रचना लिहिल्या,ज्यात गझलची तत्त्वे स्पष्टपणे दिसतात.उदाहरणार्थ,


'संतन के संग लाग रे,

तेरी अच्छी बनेगी

संतन के संग पूर्ण कमाई

होय तेरो बड़ो भाग रे 

तेरी अच्छी बनेगी '


यासारख्या अनेक रचनांतून प्रामुख्याने मानवी जीवनातल्या विविध पैलूंचे आणि आध्यात्मिक प्रेमाचे दर्शन घडले.

तेराव्या शतकापासून ते अठराव्या शतकापर्यंतचा, हा कालखंड ' पूर्व भारतेंदु युग' या नावाने ओळखला जातो. या कालखंडात हिंदी गझलचा सुरुवातीचा प्रवाह दिसतो.

तर, १८५० पासून सुरू झालेल्या, हिंदी गझलच्या दुसऱ्या प्रवाहात गझलच्या विषयांची व्याप्ती वाढलेली आढळते. प्रेम, शृंगार, मानवी स्वभावातले वेगवेगळे पैलू याव्यतिरिक्त सामाजिक विषयांचा समावेश या गझलेत होत गेला.

 त्यानंतरच्या काळातही हिंदी गझलची वाटचाल यशस्वीरित्या सुरू होती. एवढेच नव्हे तर तिच्या कक्षा अधिकच व्यापक होत होत्या, याची प्रचिती विसाव्या शतकातली हिंदी गझल देते. 

विषयांची विविधता आणि भाषेचे मिश्र स्वरूप, ही वैशिष्ट्ये व्यक्त करणारी गझल या काळात प्रामुख्याने लिहिली गेली.

 विशेष म्हणजे मैथिलीशरण गुप्त, सूर्यकांत त्रिपाठी निराला, माखनलाल चतुर्वेदी यांच्या सारख्या  कवींना गझलने आकर्षित केले होते.

हिंदी आणि उर्दू, या भाषांचे मिश्रित स्वरुप या काळात दिसत होते.

हिंदीतले प्रयोगवादी गझलकार म्हणून ओळखले जाणारे, समशेर बहादुर सिंग यांच्या गझलवर उर्दूचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो.

मुळात त्यांना उर्दू आणि हिंदी यातले अंतर मान्यच नव्हते.


दुष्यंतकुमार


आधुनिक युगात म्हणजे १९६० नंतरच्या काळात हिंदी गझलच्या क्षेत्रात सर्वप्रथम घेतले जाणारे नाव अर्थातच दुष्यंतकुमार यांचे. दुष्यंतकुमार यांनी हिंदी गझलला विलक्षण वेगळे वळण दिले.विलक्षण वेगळ्या प्रतिमा, हे त्यांच्या काव्याचे वैशिष्ट्य ठरले.


' तू किसी रेल सी गुज़रती है

मै किसी पूल सा थरथराता हूं'


अशा त्यांच्या नवीन प्रतिमा खूप लोकप्रिय झाल्या. 

दुसरी गोष्ट म्हणजे,

 प्रेम आणि शृंगार यांच्या पलीकडे जाऊन, सर्वसामान्य माणसाची व्यथा मांडण्याचे माध्यम,असे स्वरूप दुष्यंतकुमार यांनी गझलला दिले. शिवाय उर्दू आणि हिंदी यातले अंतर तर त्यांनी, पार मिटवूनच टाकले.


उर्दू-हिंदीचा देखणा संगम


खरं तर  चित्रपट संगीताने देखील या दोन भाषा कधी वेगळ्या मानल्या होत्या? हिंदी चित्रपटांच्या सुवर्ण युगातल्या कितीतरी अप्रतिम उर्दू हिंदी मिश्रित गझला आजही रसिकांच्या ओठांवर आहेत.


'रस्मे उलफ़त को निभाये तो निभाए कैसे...'


यासारख्या किती तरी गझलांनी हिंदी आणि उर्दू या दोन्ही भाषांच्या मिश्रणाचे सुंदर दर्शन घडवले.


उर्दू गझल


असे असले तरीही उर्दू भाषेतली गझल बघता बघता विलक्षण लोकप्रिय झाली. याचे श्रेय नेमके कोणाला आणि कशाला द्यायला हवे, हा प्रश्न वेगळा !

 उर्दू भाषेची नजाकत आणि तिची अदब यांची मोहिनी रसिकांच्या मनावर पडली, असे यासंदर्भात म्हणता येईल.

 उर्दू भाषेतले कितीतरी शब्द देखील आपण सहजतेने स्वीकारलेत. उदाहरणार्थ 'शाम-ए-गझल' हा शब्द आपण नेहमी वापरतो.या शब्दात असलेले उर्दू व्याकरण,आपण सहजतेने समजून घेतो. खरं तर हा उर्दू भाषेतील समास आहे.

अशा तऱ्हेने, जेव्हा एखादा शब्द वापरला जातो तेव्हा तिथे 'चा', हा अर्थ अभिप्रेत असतो.

थोडक्यात गझलमुळे उर्दू आपल्या परिचयाची झाली.

शिवाय, हृदयाचा ठाव घेणारी शब्दांची योजना ही तर गझलची खासियत ठरते. उर्दू गझलेतले, कितीतरी शेर म्हणून तर अनेक लोक भाषणात वापरतात. एखाद्या सुभाषिताप्रमाणे विलक्षण अर्थपूर्ण ठरणारे हे शेर भाषणात अनोखा रंग भरतात.

त्यातही चमत्कृतीप्रधान शेर असतील तर विचारायलाच नको. टाळ्यांची बरसात झालीच, असं समजायला हरकत नाही.


'बारिशसे ज्य़ादा तासीर हैं यादोंमें..

हम अक्सर बंद कमरेंमें भीग जाते हैं...'


यासारखे शेर मैफिलीत हमखास दाद मिळवतात.

याव्यतिरिक्त उर्दू गझलचे स्वरांशी असलेले नाते,रसिकांसोबत तिचे ऋणानुबंध जोडण्यात जास्त साहाय्यक ठरत असावे. कारण या स्वरांची साथ जरी तरल आणि क्षणार्धात संपणारी असली तरी त्यांची धुंदी मात्र कितीतरी काळापर्यंत मनात जपून ठेवता येते.

अशा अनेक वैशिष्ट्यांमुळे झपाट्याने लोकप्रिय झालेल्या आधुनिक वळणाच्या उर्दू गझलचे आद्य कवी, शमसुद्दीन वली दखनी, हे मानले जातात.

१६६८  ते १७०७, हा कालखंड 'वली 'यांच्या नावाने ओळखला जातो.उर्दू गझल लोकप्रिय करण्याचे आणि अनेक साहित्यिकांना उर्दू गझल लिहिण्यासाठी प्रेरित करण्याचे श्रेय 'वली' यांना दिले जाते.

शिवाय, यापूर्वीच्या काळात काव्यरचनेसाठी जी उर्दू भाषा वापरली जात होती, ती दक्षिणी उर्दू होती. वली यांनी दिल्लीकडे प्रचलित असलेल्या उर्दूत लिहिण्याची पद्धत सुरू करून गझलला एक नवीन वळण दिले.

या काळातली उर्दू गझल, इतर काव्यांपेक्षा वेगळी ठरली, याचे अजून एक महत्त्वपूर्ण कारण म्हणजे या गझलेत वापरले गेलेले पारंपरिक पर्शियन संकेत, हे सुद्धा आहे.

 आज लोकप्रिय असलेल्या उर्दू गझलेतले इराणी संकेत, हे सुद्धा वली दखनी यांचेच योगदान आहे. असे मानले जाते की प्रसिद्ध वयोवृद्ध शायर,गुलशन शाह, यांच्या सल्ल्याने वली यांनी गझलेत, भारतीय संकेतांऐवजी अरबस्थानातल्या, पारंपरिक संकेतांचा वापर केला.

नर्गिसी आंखे, चौदहवी का चांद, शमा-परवाना, यांसारख्या अनेक नाविन्यपूर्ण प्रतिकांचे, दिल्लीतल्या शायर मंडळींनी आणि रसिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले. म्हणूनच, तेव्हापासून उर्दू गझलेत, या संकेतांची परंपराच निर्माण झाली.या परंपरेतील उर्दू गझलच्या अत्यंत समृद्ध अशा वाटचालीबद्दल आपण जाणून घेऊ या, पुढील भागात.


(मैफल - गझल गायकीविषयक लेखमाला - ७ )

....................................................