१.
ऐकत नसेल कोणी सांगायचे कशाला ?
अन् दुःख या जगाला दावायचे कशाला ?
कोणी नसे कुणाचे ठावूक हे असूनी
डोळयांत रोज पाणी आणायचे कशाला ?
मागू नको कुणाला तू सौख्य जीवनाचे
नाही जगाकडे जे मागायचे कशाला ?
विश्वास तू तुझ्यावर ठेवून एकदा बघ
आशेवरी कुणाच्या भाळायचे कशाला ?
कर कष्ट एवढे की दुनिया पुढे झुकावी
मन रोज रोज वेड्या जाळायचे कशाला ?
केव्हा तरी मनाचे ऐकून एकदा बघ
बाहेर अंतरीचे शोधायचे कशाला ?
भाग्यात जे तुझ्या रे मिळणार ते तुला, पण
पाहून वाट त्याची थांबायचे कशाला ?
आहे मनात जेही बोलून मोकळे हो
कोंडून भावनांना मारायचे कशाला ?
सांगून येत नाही मृत्यू कधी कुणाला
हे सत्य मान्य करण्या लाजायचे कशाला ?
२.
वीट सोडुन ये कधी शोधात माझ्याही
विठ्ठला पड एकदा प्रेमात माझ्याही
ऐक ना, जिंकेन मी साऱ्या नभाला या
एवढा बस जोर दे पंखात माझ्याही
दे जगाच्या वेगळे थोडे तरी देवा
तू लिही काहीतरी दैवात माझ्याही
मी जगाला नाचविन बोटावरी माझ्या
जग फसावे एकदा डावात माझ्याही
सजविले आहे जसे आकाश, तू चंद्रा
काढ रांगोळी तशी दारात माझ्याही
३.
फुलांची बाग झाले मन, तुला भेटून आल्यावर
बरसला केवढा श्रावण, तुला भेटून आल्यावर
तुझ्या डोळ्यात जे दिसले तसे दिसले कुठे नाही
मनाने बांधले तोरण, तुला भेटून आल्यावर
कुणा सांगू,कुणा नाही, तुझे माझे तराणे हे
जगाशी तोडले बंधन, तुला भेटून आल्यावर
कशी सलगी करू वेडया नभाच्या चंद्र-ताऱ्यांशी
मला हसरे दिसे अंगण, तुला भेटून आल्यावर
दिली होती निशाणी तू जरी प्रेमात ओठांना
तरी का लाजते पैंजण, तुला भेटून आल्यावर
जगाने ठेवली आहे नजर दोघांवरी आता
कसे सांगू नवे कारण, तुला भेटून आल्यावर
कशाला पाप-पुण्याची कथा सांगू जगाला मी
अरे झाले कुणी चंदन, तुला भेटून आल्यावर
.................................................