१.
उन्हातान्हातही वेड्या बहरल्या
पुन्हा हृदयातल्या इच्छा बहरल्या
तुझी चाहूल आली सांजवेळी
मनाच्या रांगड्या वाटा बहरल्या
घरांना वेगळे चैतन्य आले
सणावारांमुळे वस्त्या बहरल्या
जुन्या गोष्टी निघाल्या आज काही
नव्या झाल्या पुन्हा जखमा बहरल्या
तळे आटून गेले काळजाचे
पुढे नाही कधी कविता बहरल्या
दिली संजीवनी त्यांना मृगाने
तशा मग वाळल्या फांद्या बहरल्या
२.
नूर वेगळा दिसतो थोडा गर्दीचा
उघडू शकतो तिसरा डोळा गर्दीचा
तिला भुलवणे तितकेही सोपे नाही
जरी चेहरा साधाभोळा गर्दीचा
मला शोधता आला नाही थांग तिचा
किती घेतला मी धांडोळा गर्दीचा
तिला जायचे आहे तिकडे जाऊ दे
नको व्हायला आपण हिस्सा गर्दीचा
हळूहळू व्यापेल आपल्या दुनियेला
वाढत जातो आहे ठिपका गर्दीचा
पायांखाली चिरडू शकते जाताना
म्हणून टाळत असतो रस्ता गर्दीचा
हमरस्त्यावर काही घडले असेल का?
ऐकू येतो आहे गलका गर्दीचा
तिने स्वतःची बुद्धी नाही वापरली
मुळात कागद होता कोरा गर्दीचा
३.
बघितले खूप उंचावून टाचा
दिसेना चेहरा सुद्धा सुखाचा
अता आहे उद्या असणार नाही
भरोसा पाहुणा आहे क्षणाचा
मळभ डोकावले जेथून आधी
तिथूनच कवडसा आला उन्हाचा
चुका करशील साऱ्या माफ माझ्या
तसा आहेस तू मोठ्या मनाचा
कसे सांगू तुला हृदयातले मी
कसा अंदाज देऊ वादळाचा
घराला वीट नाही ठेवली तू
कळस झाला तुझ्या मोठेपणाचा
...................................................