१.
तू जिथे नसतेस तेथे जात नाही
गीतही हळव्या क्षणांचे गात नाही
जर तुझी चर्चा कुण्या ओठांत नाही
मग मला त्या जायचे गावात नाही
ठेवला विश्वास ज्यांनी प्राक्तनावर
तख्त त्यांच्या राहिले ताब्यात नाही
काय कारण द्यायचे मी वासरांना
माय त्यांची आजही कळपात नाही
सावलीचा सोस त्याने का करावा
झाड ज्याने लावले दारात नाही
२.
सारे काही मनासारखे घडले आहे
फळ प्रेमाचे पदरामध्ये पडले आहे
इलाज नाही होरपळीवर त्या छायेच्या
ज्या छायेचे प्रेम उन्हावर जडले आहे
नकोस काढू पुन्हा आठवण त्या भेटीची
ज्या भेटीने हृदय आजवर रडले आहे
कशास आता मोहामध्ये तू गुंतवते
पान-पान जर आठवणींचे झडले आहे
मने जुळुनही का न भेटलो याचे उत्तर
मौनामध्ये या काळाच्या दडले आहे
३.
संकटापुरतेच त्याला आठवाया लागले
भक्त देवापासुनीही अंतराया लागले
यायचे चुकवून नजरा अन् मला बिलगायचे
भास ते हळव्या क्षणांचे मज छळाया लागले
खेचण्यासाठीच माझे पाय दोन्ही जन्मभर
रक्त त्यांचे ते नव्याने आटवाया लागले
काळजाच्या स्पंदनांनी काल जेथे लिंपले
नेमके तेथेच माझे घर गळाया लागले
येत तू स्वप्नात माझ्या छान केली सांत्वना
घाव सारे काळजाचे सावराया लागले
.................................
काशिनाथ गवळी
नांदगाव, नासिक
९८५०४४१२८७
