१.
ठेवलीच तर मैत्री ठेवू शकते
किंवा ती कट्टीही घेऊ शकते
समजूतीने घेऊया मुद्द्यांना
कट्टरता नाशाला नेऊ शकते
मदतीसाठी विचारणे तर सोडा
हे जग केवळ सल्ला देऊ शकते
तुझ्याविना मी कधीच जेवत नव्हते
तुझ्याविना का आता जेवू शकते?
एक एवढे झाड असू दे येथे
उद्या पाखरू परतुन येऊ शकते
२.
सूर्य जसा माथ्यावर आला
हात पुन्हा पोटावर आला
मनातला ढवळून हुंदका
डोळ्यांच्या काठावर आला
रुतणाऱ्या गरिबीचा काटा
तरुणपणी अंगावर आला
जरा दमाने उचल पाउले
काळ तुझ्या मागावर आला
श्वासांची ह्या गती सांगते
प्रवास हा थांब्यावर आला
नियतीने बघ दार लावले
तरी किरण दारावर आला
छुपी वाहवा ओळखली अन्
जिंदादिल मक्त्यावर आला
३.
गजामागून बघतो एक कैदी,
गजाबाहेर फिरतो एक कैदी
तुरुंगाचा पुन्हा शिक्का कपाळी
हयातीभर मिरवतो एक कैदी
भरवशावर नको राहूस आता
कुडीच्या आत म्हणतो एक कैदी
तुझा शेंदूर काढुन बघ जरा तू
तुझ्याही आत वसतो एक कैदी
तुझ्या प्रेमातली अनवट कहाणी
तुझ्या पश्चात जगतो एक कैदी
....................................................