Showing posts with label डॉ.अर्चना जुनघरे. Show all posts
Showing posts with label डॉ.अर्चना जुनघरे. Show all posts

तीन गझला : डॉ.अर्चना जुनघरे

 




१.


'फेक' पदव्यांचा खुला व्यापार झाला

शिक्षणाचा आंधळा बाजार झाला


वाहुनी ओझे मुलाचे जी न थकली

वृद्ध आईचा म्हणे तो भार झाला


वाढले विलगीकरण घरट्यात हल्ली

फोन आहे की नवा आजार झाला ?


नावडीचा नाद होता पैंजणांचा

तोच जगण्याचा तिच्या आधार झाला


लेखणी झाली मुलीचे शस्त्र जेव्हा

स्त्री युगाचा तो खरा यलगार झाला


व्यर्थ गेली लाख यत्ने मारण्याची

पाहुनी डोळ्यांत माझ्या ठार झाला


भूमिका बदलून गेली शिक्षकाची

कागदी घोड्यांपुढे लाचार झाला


२.


सात जन्माच्या तुझ्या वचनात आहे

काल होते,आजही प्रेमात आहे


बांधल्या भिंती पित्याने एकतेच्या

तेच घरटे आज का वादात आहे?


ना हवी आरास मजला माणिकांची

सौख्य माझे तू दिल्या गजऱ्यात आहे


पांघरावी शाल मी आता कशाला

ऊब प्रेमाची तुझ्या स्पर्शात आहे


वाहुनी नेईल मज अपुल्यासवे जो

तेवढी हिंमत कुण्या वाऱ्यात आहे


३.


तो असा सोडून गेला दुःख सांगावे कुणाला

मी जगावे की मरावे? प्रश्न पडला या जिवाला


मी तशी तर शांत होते बोलले काहीच नाही

काय झाले मग अचानक एवढा संताप आला


सोड ना आता अबोला त्याग रागाला सख्या तू

वाढलेला हा दुरावा साहवेना काळजाला


दे जरासा तू उजाळा गोड अपुल्या आठवांना

प्रश्न बघ पडणार नक्की भांडलो आपण कशाला


सोड लटके वागणे तू हात घे हातात आता

मी तुझी अन् तूच माझा सांग रुसलेल्या मनाला


....................................................

डॉ.अर्चना जुनघरे

(राजुरा) चंद्रपूर