Showing posts with label सायली कुलकर्णी. Show all posts
Showing posts with label सायली कुलकर्णी. Show all posts

दोन गझला : सायली कुलकर्णी

 



१.

त्या वळणावर धगधगणारी चिता पेटली होती
दोन चिमुकल्या डोळ्यांमधली आशा विझली होती

न बोलताही तिने मारली जखमेवरती फुंकर
खोल मनीची सुप्त वेदना तिने जाणली होती

कर्तबगारी नसतानाही निवडुन आला नेता
रोकड वाटत चाणाक्षांनी मते फिरवली होती

दरवळण्याचे स्वप्न संपले फूल उमलले नाही
गोड गोमटी कळी चिमुकली नाहक खुडली होती

चालू होता उत्सव, 'पार्ट्या ' संकट आले असता
दीन जनांची फिकीर सांगा कुणास पडली होती

वारा आला तरी न ढळला तोल तिचा हलकाही
भयाण मोठी लाख वादळे तिने रिचवली होती

हवेहवेसे ध्येय लांबचे टप्प्यामध्ये आले
आयुष्याला तिच्या चांगली दिशा गवसली होती

२.

स्वप्नांमागे किती धावले कळले नाही
काय हरवले, काय गवसले कळले नाही

छत्र हरपले गळ्यात पडली जबाबदारी
रम्य बालपण कधी संपले कळले नाही

बनवत गेले कणखर मन अन् सर्वांगाला
घाव उरी मी किती झेलले कळले नाही

रम्य भर्जरी चित्र उद्याचे काढत गेले
क्षण सौख्याचे किती खोडले कळले नाही

प्रसंग आला बाका कोणी मदत करेना
आप्त सोबती कुठे हरवले कळले नाही

निघून गेला मला सोडुनी तडकाफडकी
असे अचानक कुठे बिनसले कळले नाही

फुले उमलली गोड गोमटी वेलीवरती
रोप पिटुकले कधी वाढले कळले नाही

..................................................
सायली कुलकर्णी
वडोदरा
मो.९७६३०४३९५८