Showing posts with label स्नेहलता झरकर-अंदुरे. Show all posts
Showing posts with label स्नेहलता झरकर-अंदुरे. Show all posts

तीन गझला : स्नेहलता झरकर -अंदुरे

 




१.

योग्य वेळी थांबणे जमते कुठे?
मन तुझ्या ताब्यामधे असते कुठे?

फार झाली वाटते अडगळ अता
पण मनातुन ती सहज निघते कुठे?

सावलीमध्ये बसावे वाटते
झळ उन्हाची सोसणे टळते कुठे?

शांत दुरुनी भासतो सागर सदा
आतली खळबळ कधी कळते कुठे?

वाटतो कातळ जगाला कोरडा
आर्द्रता हृदयातली दिसते कुठे?

२.

हात सुटतो, पाय अडतो धडपडावे लागते
श्वास सोबत घेत अपुले सावरावे लागते

बंद दारे आणि खिडक्या, माणसांविन घर सुने
ओसरीला छत जुने पाहत झुरावे लागते

वाढले मतभेद की होतेच चर्चा वादळी
वादळांनाही तिथे थोडे नमावे लागते

वाट नसते नेहमी साधी सरळ अन् मोकळी
जायचे असते पुढे ; मागे वळावे लागते

भार पानांचा तसा नसतोच झाडांना कधी
जून पानांना तरी अलगद गळावे लागते

३.

सहज येत असते फसवता जगाला
फसव मग अगोदर स्वतःच्या मनाला

विषाहून आहे विखारी किती ती
उतारा नसावा जिभेच्या विषाला

गळाव्या व्यथाही जशी जीर्ण पाने
नवी पालवी मग फुटावी सुखाला

असा वर मिळावा कधी माणसाला
रिकामे करावे सहज काळजाला

तुझ्या अंतरंगात मिसळून जावे
विरक्ती मिळावी जशी कापराला

धरेला दिल्यावर सरी पावसाच्या
छळत एकटेपण असावे ढगाला

विसरले जरी मी अता सर्वकाही
हवेतून का तो पुन्हा गंध आला?

.................................
स्नेहलता झरकर-अंदुरे
धाराशिव
मो.९३५९८४१४९०