१.
जगून घे जरा जरा
फुलून घे जरा जरा
समोर आरसा तुझ्या
नटून घे जरा जरा
अजून दु:ख यायचे
हसून घे जरा जरा
वळीव हा उन्हातला
भिजून घे जरा जरा
सुमार हा दुपारचा
पडून घे जरा जरा
नशा जरी पिण्यामधे
जपून घे जरा जरा
रुसून नीज जायची
निजून घे जरा जरा
बदल स्वत:मधे प्रथम
करून घे जरा जरा
न शब्द आठवायचे
लिहून घे जरा जरा
ढळू नयेत आसवे
पुसून घे जरा जरा
चिता विझेल तोवरी
जळून घे जरा जरा
जिणे शिकायचे तुला
मरून घे जरा जरा
बुडायचेच शेवटी
तरून घे जरा जरा
अखेर जिंकणार तू
हरून घे जरा जरा
तिच्या दिठीतली सुधा
भरून घे जरा जरा
न फार बोलणार ती
कळून घे जरा जरा
पुन्हा न लाड व्हायचे
छळून घे जरा जरा
सराव चालला तुझा
चुकून घे जरा जरा
फकीर साबिरास तू
स्मरून घे जरा जरा
२.
आकाशाला पांघरताना झाली संध्याकाळ मंडळी!
धो-धो वर्षा कोसळताना झाली संध्याकाळ मंडळी!
उल्का झाली धावत आली तारकांस हे नंतर कळले;
मनी मुक्याने मुसमुसताना झाली संध्याकाळ मंडळी!
परिस्थितीच्या जात्यामध्ये भरडत होतो मी जखमांना;
आक्रोशाने घुटमळताना झाली संध्याकाळ मंडळी!
असे कोणते ठिकाण आहे दुःख वेदना नसेच जेथे;
तिथून त्यांना पांगवताना झाली संध्याकाळ मंडळी!
सरस्वतीच्या सागरात मी शंखशिंपले वेचत होतो;
अथांग सागर खळबळताना झाली संध्याकाळ मंडळी!
स्वप्नामधल्या रंगमहाली सौभाग्याचे हिरवे लेणे;
आनंदाने रिमझिमताना झाली संध्याकाळ मंडळी!
सूर्याच्या अन् चंद्राभवती जळत राहिलो मेणाजैसा;
मेण सुतासह मिणमिणताना झाली संध्याकाळ मंडळी!
कळ्याफुलांची बाग बहरली मला नेमके कळले तेव्हा;
सुगंध त्यांचा दरवळताना झाली संध्याकाळ मंडळी!
फुशारकीचे कालिदास ते रत्नपारखी स्वतः समजती
मनेच त्यांची जळजळताना झाली संध्याकाळ मंडळी!
नकोच 'साबिर' हेवेदावे करू नका हो कृत्य अघोरी;
नैराश्याने तळमळताना झाली संध्याकाळ मंडळी!
...................................................
बदीऊज्जमा बिराजदार
(साबिर सोलापुरी)