१.
ज्ञाना-तुका स्मरूनी कुंकू भरे मराठी
गझलेविना उद्या बघ,रांडव ठरे मराठी !
म्हणतात मीर-गालिब छंदात . श्वास घेती
कबरीस कान त्यांच्या लावो बरे मराठी !
कोठ्यावरील मुजरे इस्टेट फस्त करती
ऐकाल लावणी हो...पागल करे मराठी !
चिडवी 'चुहा पहाडी', का अस्मितेस अमुच्या?
घे कोथळा तुझा तुज, म्हण, बापरे मराठी !
देतील 'दाद' थांबा..कबरीमधून गालिब.
मज शेर ऐकवू द्या, अस्सल खरे मराठी !
२.
फुकाचे का मिळे राशन?
भुकेला घाबरे शासन
म्हणाली-'मी तुझी केवळ.'
किती आनंदले 'मी पण'
उडाला श्वास-पक्षी जर ?
जगावे चावुनी क्षण-क्षण
रणांगण रक्त मागे हो ?
बरे मौनातले भांडण !
कसा संसार सोडावा ?
तिच्या माझ्यात येतो 'पण'.
३.
तुझ्या आसवांनी भिजव पावसाला
तुझे नेत्र दाखव, रडव पावसाला!
किती छान रिमझिम तुझ्या आसवांची?
बरस तू खुशीने, चिडव पावसाला
बघू ,अश्रु धो धो कि पाऊस धो धो?
उचल नेत्र-गंगा भिडव पावसाला !
तुझ्या रिक्त प्याल्यात पिळतोय डोळे
अधाशाप्रमाणे रिचव पावसाला
दुरूनी चिडवण्यात असते नजाकत.
सिगारेट दाखव, झुरव पावसाला !
.................................
रविप्रकाश चापके
88 5585 5585