१.
खुल्या आहेत खिडक्या पण पहारा बंद दारांचा
करावा लागला छोटा तिला आकार पंखांचा
रडाया लागली सनई बडवला ऊर ताशाने
कुणाचे लग्न झाले अन् कुणाच्या अंत स्वप्नांचा
पुन्हा मागायची नाही गुलाबी जन्म ती, कारण
मिळाला जन्मभर केवळ तिला सहवास काट्यांचा
जगाला माहिती आहे तिच्या केसातला गजरा
जगाला माहिती नाही, तिच्या तो जाच केसांचा
घराने कौतुके केली तिच्या शालीनतेची पण
कुणीही ऐकला नाही तिच्या आवाज मौनांचा
तुझा सांभाळ तू बाई, सरकता काठ पदराचा
कुणीही राहिला नाही इथे निष्पाप डोळ्यांचा
२.
'अत्त दीपो भव ' दिले तू आमच्या वस्तीस बुद्धा
पण दिवे विझवून आम्ही झोपतो रात्रीस बुद्धा
राज्यकर्ते 'त्या ' अशोकासारखे आहेत कोठे?
कत्तली पाहून होतो कोण कासावीस बुद्धा?
आमच्या डोक्यात केवळ अंगुलीमालाच आहे
फक्त प्रतिमा टांगली आहे तुझी भिंतीस बुद्धा
फक्त येथे पोर्णिमेचे वाढले नाहीत उत्सव
लागले आहेत बघ उपवासही वाढीस बुद्धा
काय चुकले, जर घराला मी अजिंठा मानले तर
तू मला दिसतोस, माझ्या पाहता लेकीस बुद्धा
३.
तो जातींचे वाद मिटवण्या येतो तत्पर
एक काढतो आणि मारतो दुसरी पाचर
चर्चा आली पोटापाण्याच्या प्रश्नावर
झाले मग विषयांतर - सत्तांतर,धर्मांतर
माझ्या ताटामध्ये थोडी पडली नंतर
मला अगोदर खात राहिली माझी भाकर
वाटत असते, यावी थोडी साय दुधावर
म्हणून नाही कधी आणले घरात मांजर
तू गेल्यावर कमीच झाला माझा वावर
म्हणून नंतर पिकले नाही तितके वावर
साधे नव्हते तिने दिलेले साधे उत्तर
कानांत आणखी दरवळते आहे अत्तर
मिटणारच नव्हते त्या दोघांमधले अंतर
सूर्य तरीही रोज भाळतो का रजनीवर?
राहू नकोस विसंबून तू या गझलेवर
खपली काढुन मारत असते त्यावर फुंकर
सर्व शक्यता करत राहिल्या केवळ जर तर
माणूस आणि माणुसकीच्या चर्चेनंतर
.................................
आत्तम गेंदे
9921058414
