१.
आपल्याला आपले घेतात चावे
कलियुगाचे केवढे घातक पुरावे
संस्कृती फोफावली पाश्चात्य येथे
जाणवाया लागले मग हेलकावे
रोज व्याजाने बळी जातो बळीचा
पाहतो मी जाहली भयभीत गावे
ना कधी परके तयांना आड आले
भावकी मधले निघाले आगलावे
फक्त दुःखे टाकली पदरात माझ्या
का नियंत्या मी तुला रे आठवावे
२.
देऊन काय कोणी देणार शेवटी
अपुलाच आपल्याला आधार शेवटी
जगणे कठीण होते कायम मला इथे
मृत्यू किती निघाला दिलदार शेवटी
टाळायचे तुला तर बिनधास्त टाळ तू
माझ्याशिवाय अधुरी कळणार शेवटी
तू कर भले कितीही गावात या तुझ्या
ही भावकी तुझ्यावर जळणार शेवटी
सारे जरी 'प्रसन्ना' सोडून चालले
पण गझल सोबतीला असणार शेवटी
३.
वेळ नेहमी बदलत असते संयम बाळग
कित्येकांना घडवत असते संयम बाळग
पराभवाची नकोस चिंता करू कधीही
लढणार्याला किंमत असते संयम बाळग
रागाने तू नकोस तोडू सुंदर नाते
आयुष्याला सजवत असते, संयम बाळग
आई वडील भाऊ बहीण तुझ्यासोबती
प्रेमामध्ये ताकत असते संयम बाळग
जीवन इतके सोपे समजू नकोस केव्हा
भल्याभल्यांना रडवत असते संयम बाळग
तुला टाळले ज्यांनी कायम त्यांना जीवन
तुझ्याच मागे पळवत असते संयम बाळग
.................................
प्रसन्नकुमार धुमाळ
मु.पो आलेगाव, ता.दौंड, जि.पुणे
Mobile No.8830801103
