Showing posts with label अलका देशमुख. Show all posts
Showing posts with label अलका देशमुख. Show all posts

तीन गझला : अलका देशमुख

 


१.


किती गुंत्यात जिव हा कोवळा माझा

तुझ्या भक्तीत फुलवू दे मळा माझा


कितीदा आरती केली तुझी देवा !

कधी लागेल देवाला लळा माझा


असे मी सोयरा काळ्या विठोबाचा

भले अवतार दिसतो बावळा माझा


कुळाची राखतो हो लाजही माझ्या

उभा वाटेत हरखे सावळा माझा


कुण्या शब्दांत बांधू मौज वारीची

कशा फुगड्या नि रिंगण सोहळा माझा


कुठे शोधायची ती वाट मुक्तीची

करा हो नाथ रस्ता मोकळा माझा


२.


वाटा-वळणे जोडत जातो मिसळत जातो रस्ता 

अस्तित्वाला तोरण बांधुन  घुसळत जातो रस्ता 


मैत्र जिवांचे तत्त्व सांगतो  विसरून विषाद सगळे

ऊन पावसाळा अन थंडी  साहत जातो रस्ता


कोण कसाही चालत जावो सामावुन तो घेतो 

द्वेषभावना राग-लोभ ते  लपवत जातो रस्ता


कधी सांडल्या रक्तालाहीआत मनातच झाकुन

सुखभरले क्षण  वाऱ्यावरती उधळत जातो रस्ता


छोटेमोठे वादळवारे   अंगावरती झेलत

अविरत वाहुन भार साहतो उसळत जातो रस्ता


झाड सावलीचेही सोबत घेउन फिरतो वेडा

लांबलांब त्या सावळवाटा पसरत जातो रस्ता 


३.


मोकळे माझ्या मनाला सोडले आता जरासे

कातडे डोळ्यांपुढे मी ओढले आता जरासे


तेवढा विश्वास होता आपल्या दोघांत तेंव्हा

कोवळ्या माझ्या मना तू तोडले आता जरासे


मौन तेंव्हा घेतले तू बोलला नाहीच काही

बोलण्याचे माठ सगळे फोडले आता जरासे


कोरड्या डोळ्यांत भिजल्या आसवांचे कढ जिरवले

मोकळे केले उसासे कोंडले आता जरासे


वागणे माझेच का हो टोचते साऱ्या जगाला

त्या जगाला हात मीही जोडले आता जरासे


....................................................