१.
तू वाचले जरीही गीता, कुराण मित्रा
वाचून घे जरासे तू संविधान मित्रा
किंमत नकोच लावू पुस्तक म्हणून त्याची
अनमोल रत्न आहे एकेक पान मित्रा
बंधुत्व, प्रेम, शांती शिकवण समानतेची
दररोज त्यामुळे तर कीर्तन, अजान मित्रा
उच्चार नाव जपुनी चौघांत बोलताना
विश्वात भीमजींची कीर्ती महान मित्रा
हेरून संधिसाधू, भेकड समाज कंटक
जाळावयास अपुले भरतील कान मित्रा
गणराज्य लोकशाही केली बहाल ज्यांनी
शतदा प्रणाम करूया राखून मान मित्रा
२.
सोईनुसार येते अंगात देशभक्ती
आहे इथे कुणाच्या रक्तात देशभक्ती?
सव्वीस, पंधराव्या हमखास तारखेला
उघडी पडून असते चौकात देशभक्ती
नादात भामट्यांच्या पडुनी गुलाम झाली
फोटोत कैद आणिक नावात देशभक्ती
वाढून भाव आहे पोटातल्या भुकेचा
करणार कोण सांगा फुकटात देशभक्ती !
सर्रास होत आहे वापर तिचा अघोरी
म्हणुनी उदास आहे देशात देशभक्ती
मारून भावनांना केलेत राजकारण
त्यांच्यामुळेच फिरली उघड्यात देशभक्ती
जीवंत माणसांच्या गर्दीत राहणाऱ्या
शिल्लक अजून आहे पुतळ्यात देशभक्ती
मी भारतीय म्हणुनी ठेवा निदान थोडी
राखून खोल हृदयी श्वासात देशभक्ती
३.
रोज भांडायला एक वैरी हवा
खोट काढायला एक वैरी हवा
वाट चुकली कधी चालताना पुढे
पाय अडवायला एक वैरी हवा
दारुची जास्त झाली नशा जर कधी
ग्लास फोडायला एक वैरी हवा
गोष्ट माझीच असणार नाही खरी
चूक ठरवायला एक वैरी हवा
घाव करतात जेव्हा जवळचेच तर
मीठ चोळायला एक वैरी हवा
हौस पुरवायला भांडण्याची कधी
चौक अडवायला एक वैरी हवा
लाख असला जरी मित्र गोतावळा
झोप उडवायला एक वैरी हवा
...................................................
सुनील बावणे-नील,
बल्लारपूर, चंद्रपूर
८३०८३३४१२३
