१.
प्रत्यक्ष उडता येत नाही एरवी
इच्छा विसरता येत नाही एरवी
मुद्दाम दुःखी चित्रपट ती पाहते
मनसोक्त रडता येत नाही एरवी
देवा.. मनाच्या उंबऱ्याला पंख दे !
आभाळ बघता येत नाही एरवी
डोळ्यांतुनी बोलायची ती केवढे
वाचाळ म्हणता येत नाही एरवी
लावा गळाला भक्ष ...आमिष दाखवा.!
मासा पकडता येत नाही एरवी
नैवेद्य भांगेचा म्हणे द्या ना मला
धाकात ..हसता येत नाही एरवी
ठरवून भांडण लावले सापामधे
दोघांस डसता येत नाही एरवी
२.
आनंदाचा पुन्हा गवसला सूर मला
दुःखाने उःशाप दिले भरपूर मला
अपमानाचे घोट रिचवले यासाठी
सन्मानाचे दिसेल पंढरपूर मला
नसेल उरली गरज निरागस नात्याची
फुटकळ कारण सांगुन केले दूर मला
“कशास रडते येईल पुन्हा तो पोटी”
सांगत होता सरणावरचा धूर मला
कुशीत असते मऊ गोधडी आजीची
आठवणींचे सतावते काहूर मला
स्वार्थापोटी प्रेमाचे नाटक रचले
विश्वासाचा दिसला चक्काचूर मला
रस्त्यावरच्या दगडाचे म्हणणे ऐका
“पैशासाठी.. या फासा शेंदूर मला !”
३.
आनंदाला दुःखाचेही अस्तर आहे
कोण फिरवतो नशिबावरती नांगर आहे
ही काळाच्या डोहावरची थरथर आहे
वेळ घालते जखमेवरती फुंकर आहे
हुडकत होते सन्मानाचा एक कोपरा
घरात माझ्या असून का मी बेघर आहे ?
खडा मिठाचा कुणीच टाकू शकले नाही
जीवन माझे सुंदर होते सुंदर आहे
उदो उदो त्यांच्या लोकांचा होतो कायम
ज्यांच्या डोक्यावर सत्तेचे छप्पर आहे
करायचे तर.. या जगण्यावर प्रेम करावे
देह आपुला शंभर टक्के नश्वर आहे
स्वभाव त्याचा जणू गोड खडिसाखर आहे
भेटीनंतर कळून चुकले.. वरवर आहे
तूच तूच तू ..फक्त तूच तू …कळले का रे ?
कोण लाडका या प्रश्नांचे उत्तर आहे
दोघांमधला रुसवा फुगवा क्षणभर आहे
मैत्री म्हणजे घमघमणारे अत्तर आहे
..................................................
सुप्रिया पुरोहित हळबे ( ठाणे )