Showing posts with label सुरेन्द्र टिपरे. Show all posts
Showing posts with label सुरेन्द्र टिपरे. Show all posts

दोन गझला : सुरेन्द्र टिपरे

 




१.


सोपे जेव्हा अवघड होते 

आयुष्याची परवड होते 


बघते नुसती हसून जेव्हा 

काळजात मग धडधड होते 


मनात होता फंद-फितुरी 

किल्ल्याची मग पडझड होते


थवे तुझ्या त्या आठवणींचे

नयनांची मग रड-रड होते 


वृत्त पाळले खयाल खोटा 

गझलेची त्या बडबड होते 


२.


उगाच माथेफोड कशाला?

तत्वांशी तडजोड कशाला? 


लाडू जिलबी ठीकच आहे 

आणिक चकली गोड कशाला?


खुला खुला हा रस्ता माझा 

पळण्याची मग होड कशाला?


शब्दांचा मी पक्का आहे 

वचनाची धरसोड कशाला?


भिक्षेलाही नोट लागते 

खिशात मग ही मोड कशाला?


तुटेल तेव्हा पाहू नंतर 

उगाच आधी जोड कशाला? 

...................................................