१.
नको त्याला, नको त्याचा अताशा लागतो चाळा
हसे मी चीड झाकोनी कसेसे या कळीकाळा !
गुरूश्री वाजवी घंटा , शिपाई चालवी वर्गा
म्हणे जत्रा प्रवेशाची, ' खुळ्याने काढली शाळा !'
वधूने ऐनवेळेला भटाला घातली माला
टवाळी अंगशी येता उडाला ब्रह्मघोटाळा
दटावे, कायदा सांगे कुणा हा दंडुका खाकी ?
तया जो कायदा पाळी कथे हा,' कायदा पाळा !
सुखाचा शोध घेताना मला हे आढळे खेडे
सदा या झोपड्या उघड्या, कुठे ना दार,ना ताळा !
२.
जागृती मज आज आली ईश्वरी
प्रकटली अव्यक्त कविता अंतरी
रे अतीता, मुफ्त मूव्ही तू जरी
स्मरणरंजन देत नाही भाकरी !
सुखद दुखणी दळत राही मालिका
वास्तवाला ना भिडे ती सुंदरी !
का न लावी हात मोहोळास तो
जो अधूंना कोपराने पोखरी ?
पत्र लिहितो वृद्ध एकाकी पिता ,
' मी असेतो येत जा पोरा, घरी ! '
अंधश्रद्धा मानुनी श्रद्धेसही
पेटवी सिग्रेट तो समईवरी !
पांडुरंगाचीच रूपे भोवती
पांढरी माझी ... मला ती पंढरी
.................................
डॉ.दिलीप पां.कुलकर्णी
भ्र.ध्व. ९८२२२ ३१८६८
