ह्या लेखाच्या शीर्षकातच 'मराठी' ह्या शब्दाला 'गैर' हा उपसर्ग लावला आहे. 'गैर' हा शब्द मुळात अरबी भाषेचा आहे. त्याचा मूळ उच्चार 'घैर' म्हणजे व्यतिरिक्त. इतर, अन्यायाचा, अयोग्य, वाईट असे त्याचे अर्थ. 'गैर' हा शब्द मराठीत चांगलाच रूढ झालेला आहे. 'गैर' म्हणजे 'परका.' 'गैरसमज' ह्या शब्दात त्याचा अर्थ 'चुकीचा' असा होतो. 'त्यात काही गैर नाही.' असे आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ह्या वाक्यातही 'गैर'चा अर्थ चुकीचे, वावगे असा होतो. 'गैरहजर' या शब्दाचा अर्थ हजर नसलेला.' अशा वेगवेगळ्या अर्थाने हा शब्द मराठीत रूढ झाला आहे. असे कितीतरी शब्द आपल्या मराठीत एकजीव झालेले आहेत. त्यामुळे अमुक शब्द मराठीचा नाही म्हणून गझल लिहिताना उपयोगात आणू नये असे आग्रही प्रतिपादन अनेक गझल-मार्गदर्शक करताना दिसतात. ते भाषा समृद्धीच्या दृष्टीने योग्य नाही. इंग्रजी भाषेची ऑक्सफर्ड डिक्शनरी दरवर्षी जगभरातल्या भाषांतील अनेक शब्द स्वीकारून आपले शब्दभांडार अधिक श्रीमंत करीत असते. आपल्याकडचे 'मोर्चा', 'घेराव', 'चड्डी', 'समोसा' ह्यासारखे कितीतरी शब्द ऑक्सफर्ड डिक्शनरीने स्वीकारले आहेत. या उलट आपण 'जिंदगी' शब्द गझलेत आला की नाक मुरडतो आणि त्याला काढून टाकायला सांगतो.
व्हॉटसअपवर मला अनेक नवोदित ह्या संबंधी विचारतात. त्यांचे समाधान माझ्यापरीने मी अनेकदा केले आहे. ह्या जिज्ञासेतूनच प्रस्तुत संशोधनपर लेख तयार झाला आहे.
लेखातील संक्षेप-
हिन्दी - हिं
अरबी - अ
फारसी - फा
संस्कृत - सं
इंग्रजी - इं
प्राकृत - प्रा
ललकार (हि)
सारखी ही बंडखोरी चालली माझी कधीची
कृद्ध विश्वाने दिलेली एक मी ललकार आहे !
(रूपगंधा / पृ. ४४ )
फरारी (अ)
बसून खोटारड्यात मीही करू कशी अब्रुदार पापे ?
कळे न माझ्यामधून होऊ कधी, कसा अन् कुठे फरारी ?
( रंग माझा वेगळा/ पृ. २१ )
पुकारे (हि)
उंच आकाशात माझी गुंजने होतील तेव्हा
सारखे होतील माझे पर्वतामाजी पुकारे !
( रंग माझा वेगळा/ पृ. ४२ )
डोळे मिटून रूप तुझे मी निहाळले
माझे शिवून ओठ कितीदा पुकारले !
( रंग माझा वेगळा/ पृ. ५३ )
हा न टाहो दुःखितांचा, हा सुखाचा ओरडा ;
होत आहे दूर बंडाचा पुकारा वेगळा !
( रंग माझा वेगळा/ पृ. २१ )
सांजवेळीच भेटलीस कशी ?
मी पहाटे पुकारले होते !
(एल्गार पृ. ३६)
हा पहा लागला अर्थ बोलावया ( शब्द येतील, त्यांना पुकारू नये ! )
(एल्गार पृ.५०)
माणसांना हाक मारू लागलो
बंद खोल्यांना पुकारू लागलो
(एल्गार/ पृ. ५३ )
एखादा वाटसरूही थांबला न माझ्यासाठी
मी पळणाऱ्या पाठींना नुसताच पुकारत होतो !
( झंझावात पृ. १ )
बाकाबुलंद
बाँका (सं) = अनोखा
बुलंद (फा) = उत्तुंग
बांधू हवेत किल्ला बाकाबुलंद यंदा
त्या क्रांतिकारकांचा आवाज बंद यंदा
(एल्गार पृ.५१)
अर्जमंद (फा)
उच्च, प्रतिष्ठित, मान्य, सफल, कामयाब, प्रतापी, योग्य, नेक, अक़लमंद
आर्झूमंद (फा) इच्छुक, उत्सुक
प्रत्येक चेहऱ्याचा मी आरसा तरीही माझ्याच दर्शनाचा मी अर्जमंद यंदा
(एल्गार पृ.५१)
टेंडरे (इं)
बोंबा अशा मारू नको !
त्यांना तुझी चिंता किती !
मागेच दुःखाची तुझ्या भरली तयांनी टेंडरे !
( रंग माझा वेगळा/ पृ. ५४)
लेक्चरे (इं)
येतात जे ओठावरी ते शब्द तू बोलू नको
असती तुझ्या गरजेहुनी गरजू तयांची लेक्चरे !
( रंग माझा वेगळा/ पृ. ५४)
गुजारा (फा) गुजारः
ते भिकारी थोर, त्यांच्या धर्मशाळा वेगळ्या,
चालतो छंगाल सत्याचा गुजारा वेगळा !
( रंग माझा वेगळा/ पृ. ६९ )
आजमावत (आजमाना - फा).
उगिच मी इथल्या जगाला आजमावत राहिलो !
ह्या प्रतिष्ठित उकिरड्यांवर जीव टाकत राहिलो !
( रंग माझा वेगळा/ पृ. ७३ )
एल्गार ( फा . येल्गार, एल्गार, इल्गार = मोहीम ; तुर्की ईल्घार )
साध्याच माणसांचा एल्गार येत आहे ...
हा थोर गांडुळांचा भोंदू जमाव नाही
( एल्गार पृ. १ )
जबाब (अ. ज़वाब)
सवाल (अ)
जाबसाल (अ) प्रश्नोत्तर, संभाषण
आपुल्याच आयुष्याशी जाबसाल झाले...
जे जबाब आले त्याचे ते सवाल झाले !
( एल्गार पृ. ४ )
सवाल(अ)
सांग मी काय नेमके बोलू ?
सांग माझाच तू सवाल मला !
( एल्गार पृ. १३)
खुशामत ( फा. ख़ुशामद)
अडवून जरी शब्दांनी भरपूर खुशामत केली दारात वर्तमानाच्या मी अर्थ उद्याचा नेला !
( एल्गार पृ. ७ )
अलबेला (सं. अलभ्य+हिं. ला -प्रत्यय)
घासते घरोघर भांडी स्वप्नांची राजकुमारी
वणवणतो पोटासाठी हा राजपुत्र अलबेला
( एल्गार पृ. ७)
मशहूर ( अ- मुश्हूर ) प्रसिद्ध
शेवटी वेदमंत्रांनी अन्याय एवढा केला
मशहूर ज्ञानया झाला...
गोठ्यातच जगला हेला
(एल्गार/ पृ. ७ )
शिकस्त (फा)
इरादे (अ).
अताच कोणी फकीर माझ्या घरापुढे ओरडून गेला
शिकस्त झालास तू न बेटा, तुझे इरादे महान होते !
( एल्गार पृ. ९)
खानदान (फा)
घरोघरी हीच एक चर्चा-तिचे घराणेच राजवंशी !
(जिते न ते बंडखोर ज्यांचे भिकारडे खानदान होते )
( एल्गार पृ. ९)
इमान
असे दिले शब्द श्रृंखलांनी असा दिला त्वेष दुःखितांनी
दुभंग मी राहिलो तरीही अभंग माझे इमान होते
( एल्गार पृ. ९)
फिर्याद ( फा. फ़रियाद)
बेगुमान (फा)
अम्हास फिर्यादही खुनाची तुझ्यापुढे आणता न आली
तुझ्या महालामधील खोजे तुझ्याहुनी बेगुमान होते
( एल्गार पृ. ९)
फिर्यादी (फा)
मी कधीचा उभाच फिर्यादी
वाकुल्या दाखवी निकाल मला
( एल्गार पृ. १३)
दलाल (अ)
संत समजून काल मी गेलो
भेटला शेवटी दलाल मला
( एल्गार पृ. १३)
दिलासा
[फ़ा. दिल + हिं. आसा]
असे हे कसे जीवनाचे दिलासे ?
दिलाशांस मी देत आहे दिलासा !
( एल्गार पृ. २०)
मशाली (अ. - मशअल, मिशाअल)
दिवसाच चोरट्यांनो जाळू नका मशाली
अजुनी न सूर्य केला तुमच्या कुणी हवाली !
(एल्गार पृ. २१)
जखमा (जख्म-फ़ा)
जखमा बुजून गेल्या साऱ्या जुन्या तरी उसवीत जीवनाला बसते कधीकधी
(एल्गार पृ. २२)
आबाद (फा)
या पिशाच्च्यांच्या कशा आबाद वस्त्या ?
माणसांची ही कशी ओसाड गावे ?
(एल्गार पृ. २७)
खुलासे (अ.खुलासा )
मी खुलासेही कशासाठी करावे ? लोक पाठीमागुनी घेतात चावे !
(एल्गार पृ. २७)
जल्लाद (अ)
सांगतो जल्लाद रक्ताचा घरोबा
(सांडलेले रक्त का होते परावे ?)
(एल्गार पृ. २७)
मामला (अ)
इथे मी सोसला माझा अशासाठीच बोभाटा
कळ्यांची काळजी होती ! फुलांचा मामला होता !
(एल्गार पृ. २९)
फैसला (अ)
मला बोलायाचे होते... कुणी बोलू दिले नाही
जसा आधीच केलेला जुना तो फैसला होता !
(एल्गार पृ. २९)
.
लोक रस्त्यावरी यावया लागले
दूर नाही अता फैसला यार हो !
(एल्गार पृ. ३१)
यार (फा)
सूर्य केव्हाच अंधारला यार हो
या, नवा सूर्य आणू चला यार हो
(एल्गार पृ. ३१)
ह्याच आनंदात माझा प्राण गेला कापला ज्याने गळा तो यार होता
(एल्गार पृ. ४५)
कैदखाना (फा. अ )
हे नवे फक्त आले पहारेकरी
कैदखाना नवा कोठला यार हो ?
(एल्गार पृ. ३१)
बहाणा (फा- बहाना )
राग नाही तुझ्या नकाराचा
चीड आली तुझ्या बहाण्याची. !
(एल्गार पृ. ३२)
साधीसुधी न होती माझी स्मशानयात्रा ..
आली तुझी निमित्ते ! आले तुझे बहाणे !
(एल्गार पृ.४०)
दिवाण्याचे (फा. दीवाना )
'नाव' हे त्या तुझ्या दिवाण्याचे
( काळजी घे जरा उखाण्याची )
(एल्गार पृ. ३२)
येथे कुणीच नाही माझ्यापरी दिवाणे
मी गीत गात आहे येथे गुन्ह्याप्रमाणे
(एल्गार पृ.४०)
कर्ज (अ)
जरी अजून तुझे कर्ज राहिले नाही
अजून घेत रहा जीवना पिळून मला
(एल्गार पृ. ३३)
बचाव (हि)
अता फासावरी हा मी हसाया लागलो आहे
तुझ्या न्यायास मी संधी दिली नाही बचावाची !
(एल्गार पृ. ३९)
गुन्हा (फा -गुनाह)
येथे कुणीच नाही माझ्यापरी दिवाणे
मी गीत गात आहे येथे गुन्ह्याप्रमाणे
(एल्गार पृ.४०)
पुराणे ( सं - पुराना )
दे जीवना मला तू आता नवी निराशा
हे दुःख नेहमीचे झाले जुनेपुराणे !
(एल्गार पृ.४०)
नामंजूर ( अ- मन्झूर ) अनिष्ट, अवांछित असम्मत अमान्य
कोणत्या स्वप्नास आता दोष देऊ ?
जीवनाला मीच नामंजूर होतो !
(एल्गार पृ.४१)
चूर (सं)
प्रीतही आली फुलांच्या पावलांनी हाय, मी चिंध्यांत माझ्या चूर होतो
(एल्गार पृ.४१)
बेकायदा (फा) नियमबाह्य
रजामंदी (फा) सम्मती
चला गाऊ सुगंधाची पुन्हा बेकायदा गाणी
फुलांना टाळते आहे वसंताची रजामंदी
(एल्गार पृ.४१)
फुंकरीचीच ही अशी दुनिया
वाट पाहू नका इशाऱ्याची
(एल्गार पृ.४६)
नालबंद (फा) नाल ठोकणारा
नालबंदी = नाल ठोकणी
रिसाला (अ) सैनिकांची तुकडी
जो झुंजणार होता तो हा नसे रिसाला
ही फौज गाढवांची जी नालबंद यंदा
(एल्गार पृ. ५१)
लण्ड (फा) देवधर्माला न मानणारा मनुष्य, कलंदर
फंद (फा) फसवणुक, कौटिल्य, वाईट नाद, बंडाळी
सांगाच भाविकांनो माझे विमान कोठे
संतांसमान केले मी लंदफंद यंदा
(एल्गार पृ. ५१)
पसंद (फा) रुचिकर, प्रिय, मनभावन
त्यांच्या समर्थनांचे होते गुन्हे असे की,
माझे जुने गुन्हे मी केले पसंद यंदा
(एल्गार पृ. ५१)
कुठलेच फूल आता मजला पसंत नाही
कळते मला अरे हा माझा वसंत नाही
(एल्गार/ पृ. ८७)
गुदस्ता (फा) गेल्या वर्षी
ते वेगळेच काटे होते इथे गुदस्ता
हे वेगळेच काटे खाती मरंद यंदा
(एल्गार पृ. ५१)
तेजाब (फा) आम्ल ( अॅसिड )
पुन्हा तेजाब दुःखाचे उरी फेसाळुनी गेले
पुन्हा ओठांवरी गाणे तुझे घोटाळुनी गेले
(एल्गार/ पृ. ५५ )
मिजास (अ) अभिमान, ऐट
राहिले रे अजून श्वास किती
जीवना, ही तुझी मिजास किती
(एल्गार/ पृ. ५६ )
सुका (सूखा - सं) कोरडा, शुष्क
सांडोत जेवतांना ताटात आसवे कोणीच घास अर्धा घेऊ नये सुका
(एल्गार/ पृ.६०)
वेडापीर
पीर (फा) साधू,
वेडा - पीर = खुळा, भ्रमिष्ट
चार शब्दांनीच आले का तुझ्या डोळ्यात पाणी
सोड त्याचे बोलणे .. तो एक वेडापीर होता !
(एल्गार/ पृ. ७१)
दिलगीर (फा - दिल्गीर) दुःखी, असंतुष्ट
शेवटी सोयीप्रमाणे शोधले त्यांनी बहाणे
हा असा लाचार होता, तो तसा दिलगीर होता
(एल्गार/ पृ.७१)
हमी (अ) जामीनकी
जिवंत कोण ? कुणालाच बातमी नाही
दिसे हरेक तरी.. सावली हमी नाही
(एल्गार/ पृ.७७)
लढाई ( हिं) युद्ध
जिंकणाऱ्यांनाच आता वाटते भीती जयाची
हारणाऱ्यांनी न केली बंद केव्हाही लढाई
(एल्गार/ पृ.७९)
बढाई (हिं . सं) आत्मस्तुती
फुशारकी, प्रौढी
जे सुळी गेले तयांची झुंजती अद्याप स्वप्ने
(वाचण्यासाठीच आता जिंकणाऱ्यांची बढाई )
(एल्गार/ पृ.७९)
चढाई (हि) आक्रमण
जिंकणाऱ्यालाच अंती आठवे भाषा तहाची
हारणाऱ्याची न थांबे हारतांनाही चढाई
(एल्गार/ पृ.७९)
मनाई (अ) प्रतिबंध
जिंकणाऱ्यांना कधीही जिंकता आलेच नाही
अन् जितांच्या हारण्याला भूतकाळाची मनाई
(एल्गार/ पृ.७९)
शौक़ (अ) व्यसन
लागला आहे अताशा वेदनेचा शौक त्यांना
(एरवी, त्यांचा सुखाचा चोरटा व्यापार होता )
(एल्गार/ पृ. ८९)
ताबेदार ( अ + फा )
आज्ञाधारक, सेवक, नोकर
गाडल्या त्यांनी पिढ्या अन् ठेवला नाही पुरावा
या स्मशानाच्या धन्यांचा देव ताबेदार होता !
(एल्गार/ पृ. ८९)
दिलदार (फा) उदार
आयुष्य संपतांना इतकीच खंत होती -
काही भिकारड्यांना दिलदार मानले मी !
(एल्गार/ पृ. ९३)
याद (फा) स्मरण
कुणी घाव केला तेव्हा मला आठवेना
पुढे काय झाले माझे ? मला याद नाही !
(एल्गार/ पृ. ९५)
बाद - ( अ ) नंतर,वजा
सावकाश आयुष्याचा खेळ खेळलो मी
बाद होत गेले सारे, मीच बाद नाही
(एल्गार/ पृ. ९५)
हरामखोरांचा (अ + फा)
कृतघ्न, आयते खाणारा,कामचोर
राहिली जगी माझी एवढीच पुण्याई -
मी न सोयरा झालो ह्या हरामखोरांचा !
(एल्गार/ पृ. ९६)
सुनावत (हि) ऐकवत
जे काय बोलली, तेव्हा ते पार विसरुनी गेलो.
तू सांग, तुला आताही मी काय सुनावत होतो ?
( झंझावात पृ.१ )
उचापत (हि - उचापट)
उपदव्याप
मी एक उपद्रव होतो कोणास न परवडणारा
ते सर्व समंजस होते, मी मात्र उचापत होतो
( झंझावात पृ.१ )
कुरापत (अ- खुराफत )
भांडण उकरून काढण्याला शोधलेले निमित्त
यामुळेच माझे 'असणे' झटकले तुम्ही पण
तेव्हा तुमच्या थोतांडांची काढीत कुरापत होतो !
( झंझावात पृ.१ )
अनामत (अ) ठेव
जमणारच नव्हते माझे या माझ्या चोरपिढीशी
मी येणाऱ्या काळाची अनमोल अनामत होतो !
(झंझावात पृ.१ )
शिकार (फा) मृगया
आपापल्या सुखाशी केला करार त्यांनी ....
मी बोचताच माझी केली शिकार त्यांनी !
(झंझावात पृ. ३)
सौदा (अ) खरेदी -विक्री
त्यांच्या शिरी कधीचे देणे युगायुगांचे ...
आता फिरून केला सौदा उधार त्यांनी !
(झंझावात पृ. ३)
दगाबाज (फा) कपटी
गडे, आता मला माझा भरोसा राहिला नाही
मघाचा श्वासही माझा दगाबाजांतला होता
(झंझावात पृ. ६)
जुगारी ( सं. द्यूतकार ) पैशाच्या लोभाने किंवा नशिबाची परीक्षा पाहण्याकरिता करमणुकीच्या खेळात पैसे लावून खेळणे, जुवा,द्यूत.
तारकांचा डाव तेव्हा हारलो मी
काय मी साधासुधा होतो जुगारी ?
(झंझावात पृ. ७)
फरारी (अ फरार)
गुप्त, गायब, भूमिगत
मी किती तोंडांस हाणू भुंकणाऱ्या
शेपट्या घालून ते होती फरारी !
(झंझावात पृ. ७)
कसूर (अ - कुसूर) अपराध
नजीक (फा - नझ्दीक) जवळ
हरेक (हि - हर एक)
जगून मी पाहिले इथे, हा खरेच माझा कसूर होता
नजीकचा दाट ओळखीचा हरेक माणूस दूर होता
(झंझावात पृ. १०)
हरामखोर (फा / अ) कृतघ्न
हरामी (अ) व्यभिचारातून उत्पन्न, कामचोर
कोहिनूर (फा /अ) कोह-ए-नूर
प्रकाशमान पर्वत, अमूल्य हिरा
मलाच त्याने विरंगुळ्याला उगाळले कोळशाप्रमाणे हरामखोरांतही हरामी खरेच तो कोहिनूर होता
(झंझावात पृ. १०)
सबूर (अ) धीर
तुला कुठे सांग वेळ होता फिरून मागे वळावयाला ?
इथेच खोळंबण्यास तेव्हा कुठे मलाही सबूर होता
(झंझावात पृ. १०)
फितूर (अ) गद्दार
मला न गीते दिली फुलांनी .. पुन्हापुन्हा टाळले दिशांनी
तुझेच सारे सुगंध होते ! तुलाच वारा फितूर होता
(झंझावात पृ. १०)
इरादा (अ) मनातली इच्छा
जरूर (अ) अवश्य
उगीच माझ्यातुझ्या मिठीच्या अजूनही रंगतात चर्चा,
कधीतरी मात्र चांदण्याचा तसा इरादा जरूर होता
(झंझावात पृ. १०)
इरादा (अ ) विचार, हेतू, बेत
मी तुला जाणू दिला माझा इरादा, तो गुन्हाही केवढा निर्व्याज होता !
(झंझावात पृ. १५)
टापू (हि) द्वीप
ऐक, जातींच्या बिळांनी गर्जना केली
'हातही लावू नका, हा आमचा टापू ! '
(झंझावात पृ. ११)
भरोसा (सं) विश्वास
लफंगा (फा) लंपट
मी भरोसाही धरावा आज कोणाचा ?
हा लफंगा ! तो हरामी ! तो गळेकापू !!
(झंझावात पृ. ११)
नाराज (अ) नाखुश, अप्रसन्न
केले जरी सुखांनी नाराज चेहरे,
मी लाड वेदनेला माझे करू दिले !
(झंझावात पृ. १२)
वागलो काही न वेडेवाकडे मी...
रात्र होती अन् दिवा नाराज होता !
(झंझावात पृ. १५)
अंदाज (फा) तऱ्हा, हावभाव, अदा
जाणत्यांचा वेगळा अंदाज होता
एकटा माझा खुला आवाज होता !
(झंझावात पृ. १५)
लफंग्या (फा) लंपट, धोकेबाज
ऐकलेल्या घोषणा होत्या लफंग्या, पाहिलेला संत धोकेबाज होता !
(झंझावात पृ. १५)
*लाफे*
राखली त्याने मने खाऊन लाफे,
तो शहाणा, धोरणी पखवाज होता
(झंझावात पृ. १५)
बेमान (फा) अधर्मी, कृतघ्न, अविश्वसनीय
मोठमोठ्यांच्या शिव्यांनी धन्य केले
मात्र त्यांचा रागही बेमान आहे !
(झंझावात पृ. १७)
नादान (फा) अज्ञानी
भेटलेले भामटे होते 'यशस्वी '
मी असा नादार अन् नादान आहे !
(झंझावात पृ. १७)
अस्मान (फा - आसमां) आकाश
ही निळी शाई न माझ्या लेखणीची..
वाहणार हे निळे अस्मान आहे !
(झंझावात पृ. १७)
सामान (फा) उपयोगी वस्तू
हा कुठे आहे खरा संसार माझा कोणते माझे घरी सामान आहे.
(झंझावात पृ. १७)
दलाली (अ - दलाल ) अडत, कमीशन
संपून राख गेली, हाडे विकून झाली !
ते मागतात आता आपापली दलाली !
(झंझावात पृ.२२)
मवाली (अ) गुंडा, बदमाश
हे चेहरे कुणाच्या नाहीत ओळखीचे ?
काही जुने लफंगे ! काही नवे मवाली !
(झंझावात पृ.२२)
कवाली (अ - कव्वाली) सुफियाना गझल किंवा गीत
कंटाळले जसे ते गाऊन शोकगीते,
आली हळूच त्यांच्या ओठांवरी कवाली !
(झंझावात पृ.२२)
हमाली (अ - हमाल )
नाही दिला फुकाचा त्यांनी विनम्र खांदा,
ते प्रेत वाहण्याची घेती अता हमाली !
(झंझावात पृ.२२)
खुराक (अ - ख़ुराक) खाद्य, भोजन, दवा की निश्चित मात्रा,आहार
हवाली (अ -हवाला)
सोपवणुक, जबाबदारी, भिस्त
त्यांनाच हाक मारा पिंडासही शिवाया !
त्यांचा ' खुराक ' आता त्यांच्या करा हवाली !
(झंझावात पृ.२२)
कलंदर (फा) मुसलमान फकीर
हे एकटे गाणे तुझे नाही बरे, माझी जगायाची कलंदर
धून घे !
(झंझावात पृ.२५)
जिंदगानी(फा - ज़िंदगानी ) जीवन अवस्था, आयु, प्राण
मला ही जिंदगानीची नशा आता पुरे झाली
जराशा झिंगण्यासाठी कधी मी पीतही नाही !
(झंझावात पृ.२६)
जिंदगी (फा - ज़िंदगी ) जीवन, प्राण
कुणी मला ही पुन्हा दिली याद जिंदगीची ?
जिवंत हा मी असून ताब्यात श्वास नाही !
(झंझावात पृ.२७)
कूक (हि) कोकिळ, (कुहुक) मोराचा (केका) लांब ध्वनी
ही अशी झाली कशी निष्पर्ण झाडे ?
वाळली कोठे, कळेना, कूक माझी ?
(झंझावात पृ. ३३)
हूक (सं) काळजात अचानक येणारी तीव्र कळ
ऐकतो, जातो तिथे चर्चा तुझी मी,
काय गावोगाव गेली हूक माझी ?
(झंझावात पृ. ३३)
बकवे (हि - बकवास ) बकबक
फतवे (अ - फ़तवा) धर्मगुरूचा लेखी आदेश
पडतात रोज कानी बकवे तन्हेतऱ्हेचे !
निघतात बादशाही फतवे तऱ्हेतऱ्हेचे !
(झंझावात पृ. ३४)
बिचवे ( सं- वृश्चिक / हिं-बिछुआ ) विंचवाच्या आकाराची लहान, वाकडी कट्यार
एकाच चेहऱ्याला मी आठवू कशाला ?
जखमी करून गेले बिचवे तऱ्हेतऱ्हेचे !
(झंझावात पृ. ३४)
झूट (सं. शठ, प्रा. झट्ठ = असत्य ; हिं. झूठ) असत्य
रोखले ( सं - रोकना) थांबवणे
खरे की काय, त्या होत्या वदंता झूट तेव्हाच्या
फुलांनी श्वास त्या रात्री कशाला रोखले होते ?
(झंझावात पृ. ३५ )
काटाकाट (सं - काटणे ) खोडताड, खाडाखोड
कोण जाणे, ते कुणाचे पत्र होते ? नेमक्या जागीच काटाकाट होती !
(झंझावात पृ. ४३ )
हुल्लड (हिं-हूलड ) गर्दी, ओरड, गडबड, हुलकट, बंडाळी, दंगा
केव्हाच त्यांच्या गरजू वचनांची दंगल शमली !
ऐकू न कुणाला येई शब्दांची हुल्लड आता !
(झंझावात पृ.५१ )
बेजार (फा) नाराज
गुन्हेगारी अशी की,
गुन्हा बेजार झाला !
(झंझावात पृ. ७३ )
आजार (फा - आज़ार ) रोग
जगाच्या औषधांचा
मला आजार झाला !
(झंझावात पृ. ७३ )
सलामत (अ)
सुरक्षित
ह्या रडणाऱ्या स्वप्नांची समजूत कशी घालू मी?
माझीच आज एकाकी सांत्वना सलामत नाही !
( सप्तरंग पृ. १७ )
पराया (हि) परका
कोणास कसा वाखाणू ? कोणाला दूषण देऊ ?
कोणीच आपला नाही कोणीच पराया नाही !
(सप्तरंग पृ. ६७ )
जिन्दा (फा) जीवित
गाव हा माझाच माझा आपला नाही
एकही माणूस जिन्दा वाटला नाही !
(सप्तरंग पृ. ९२ )
गुजरना- क्रिया संज्ञा [फ़ा. गुज़ार + हिं ना (प्रत्यय)] बिताना, काटना
ह्या उदास मावळतीला मी उगीच पुसतो आहे -
"मी कसा राहिलो येथे ? मी दिवस गुजरले कोठे ? "
(सप्तरंग पृ. १०८)
शोध घेतला तर आणखी बरेच शब्द सापडू शकतील. परंतु मुद्दा समजण्यासाठी तूर्तास एवढे पुरे.
....................................................
संदर्भ -
सुरेश भटांचे काव्यसंग्रह :
१. रूपगंधा,साहित्य प्रसार केंद्र, नागपूर, व्दितीय आवृत्ती १९९१
२. रंग माझा वेगळा,साहित्य प्रसार केंद्र, नागपूर, पाचवी आवृत्ती १९९२
३. एल्गार, बहुमत प्रकाशन, नागपूर, प्रथम आवृत्ती १९८३
४. झंझावात,साहित्य प्रसार केंद्र, नागपूर, प्रथम आवृत्ती १९९४
५. सप्तरंग,साहित्य प्रसार केंद्र, नागपूर, द्वितीय आवृत्ती २००५
शब्दकोश-
१.फार्शी-मराठी-कोश - प्रो. माधव त्रिंबक पटवर्धन,
भारत इतिहास संशोधक मंडळ पुणे - पहिली आवृत्ती १९२५
२.आदर्श मराठी शब्दकोश- डॉ. प्र.न.जोशी, विदर्भ मराठवाडा बुक कं., द्वितीय आवृत्ती १९८२
३. मराठी शब्दकोश खंड १ ते ६ सं. प्राचार्य रामदास डांगे
म.रा .सा.सं.मंडळ, मुंबई,
प्रथम आवृत्ती मार्च २००९ ते जुलै २०१३
