Showing posts with label मनाचा गूढ गाभारा : धनंजय तडवळकर. Show all posts
Showing posts with label मनाचा गूढ गाभारा : धनंजय तडवळकर. Show all posts

मनाचा गूढ गाभारा : धनंजय तडवळकर



                                      

जगातील सर्वात महत्त्वाचा ग्रंथ असलेल्या 'भगवद् गीता ' या महान ग्रंथाचा मनापासून अभ्यासक असलेला कवी/गझलकार श्री.अभिजीत काळे, गीतेमधील श्लोकांना आपल्या विचारांत मांडताना देखील चिंतन, मनन करतो आणि एका श्लोकाचा अर्थ सांगताना म्हणतो, 'आपणास आपला, स्वतःच स्वतःचा उद्धार करायला हवा. आपण आपले अध:पतन म्हणजे स्वतःच स्वतःला हतोत्साही करू नये.आपण स्वतःच स्वतःचे बंधू व मित्र आहोत आणि स्वतःच स्वतःचे शत्रू देखील ' अजून एका श्लोकाचा अनुवाद करताना 

तो पुढे म्हणतो , ' जिचं गायन केलं जाऊ शकेल, असं काव्य म्हणजे 'गीता'. गीतेचं गायन, चिंतन व मनन केल्यास, इतर शास्त्रविस्तारात जाण्याची आवश्यकता वाटत नाही."

असं केवळ म्हणून, सांगून तो थांबत नाही तर ते सर्व तो आचरणात आणण्याचा ,आपल्या काव्यात उतरविण्याचा नेहमी प्रयत्न करतो, असं मला त्याचा

'मनाचा गूढ गाभारा' ह्या नव्याने  आलेल्या गझलसंग्रह वाचताना नक्की जाणवले ! यातील प्रत्येक शेर कागदावर येण्याआधी, त्याचं मनन, चिंतन कवीच्या मनात नक्की चालू असणार अशी खात्री वाटते.


१०१ गझल असलेल्या या संग्रहात, अभिजीतने आतापर्यंतचे आपलं सर्वस्व ओतलंय, हे जाणवत राहते ! या संग्रहातील गझलांमध्ये , माणुसकी आहे, अध्यात्म आहे, प्रेम आहे, विरह आहे आणि एक विचार देखील आहे. खालील शेर वाचताना मला विलक्षण अनुभवांनी घेरले होते नक्की :

     

'चालताना जसा मी पडू लागलो

घाव एकेक मिरवत घडू लागलो'


'पहातो आहेस तू रोखून का शिखरा ?

संपते स्वारस्य , माथा गाठल्यानंतर'


'तोच प्रामाणिक नसावा आपल्या अंतर्मनाशी

ज्या कुणाला वाटते की,मी कुठे चुकलोच नाही'


'उद्या जिंकेल गोगलगायही  स्पर्धा

ससा जोवर हुशारीने पळत नाही'


काळजी त्यांची कशाला ?सोडून गेले तुला ते

सोहळे त्यांचा करू जे राहिले हातावरी कण'


'आंधळ्या बुद्धीस आळस भेटला

कष्टही गळफास घेण्या धावले'


वरील नमुना शेर वाचताना , संग्रहाबद्दलची आपुलकी 

आपोआप वाढत जाते. शिवाय यातील रिवायती गझला सुद्धा लक्ष वेधून घेतात आणि रसिक पुढे वाचत जातो. या संग्रहाची प्रस्तावना लिहिणारे मितभाषी  सुप्रसिद्ध गझलकार प्रमोद खराडे म्हणतात, 'गझलेवर अखंड चिंतन करणाऱ्या, लिखाणात सातत्य असणाऱ्या शिवाय  तितक्याच निष्ठेने गझल वाढीसाठी कार्यरत

असणाऱ्या गझलकाराचा म्हणजेच अभिजीत काळे यांचा संग्रह आपल्या हाती आला आहे. ' ते पुढे म्हणतात, 'या गझलकाराची लेखणी आयुष्यातील, जगण्यातील सारे रस शब्दबद्ध करते.त्यांच्या शेरात मिलन ,विरह जाणवते. दु:ख, वेदना तर कवींची पुंजीच म्हणायला हवी पण असं असतानाही काळे यांची लेखणी कुठेही त्रागा करताना दिसत नाही.ती संयमित आहे. ती मोजक्या शब्दांत भरभरून बोलते.' 

किती सुंदर आणि चपखल शब्दातील ही प्रस्तावना आहे.  


आता काही प्रेम ,विरह, मिलन यावरील शेर पाहूया :


'तुला पाहून सुचल्या दोन ओळी

उभे आयुष्य पुरल्या दोन ओळी'


'ह्या प्रेमाचे कौतुक सांगू ?

हसतो आपण फसतो आपण'


कळेना प्रेम आहे की, असावा राग व लज्जा ?

कशाने एवढी आली तुझ्या गालांवरी लाली ?'


'तिने पाहिले त्याला त्याने तिला पाहिले

अबोल क्षणही शब्द मनावर लिहून गेला '


'वर्तमान मी जगतो आहे आनंदाने

दुधात विरजण हवी कशाला तुझी आठवण'


पाणावताच डोळे, 'येतो' म्हणून जातो

'भेटायचे पुन्हा' मी निश्चय करून जातो'


'वाहत्या जखमा लपवल्या मी उराशी

वाहणे त्यांचे तरीही उघड आहे'


असे काही सुंदर पण डोळे पाणावणारे शेर, तितक्याच सुंदर आणि भावगर्भ गझलांमधून गझलकाराने पेरले आहेत.

गीतेवरील दृढ विश्वास आणि संस्कृत भाषेचा डोळस अभ्यास यामुळे 'अध्यात्म्या' वरील शेर सुद्धा जमून आले आहेत.


डोह माझा असे खोल 'मन' राखुनी

तळ स्वतः शोधता आवडू लागलो '


'संभ्रम खरोखरी का होता मनात त्याच्या ?

अर्जुन कुणास कळला गीतेस वाचतांना'


'माजात नाचण्यातच तारुण्य व्यर्थ गेले

आयुष्य सांडलेल्या वृद्धास सल विचारू'


'जोवर सुपात तोवर नाचत रहा खुळयांनो

होणार पीठ शेवट जात्यात जीवनाच्या"


'विश्वास पेरण्याचे घ्या काम आज हाती

फळतील सर्व बागा द्या एवढा हवाला'


'ऐलतिराला अखेर लाभो पैलतिरीचा शांत किनारा

इच्छा ठेवत मनात इतकी बसण्यासाठी पळतो आहे'


'पडते गळून येथे प्रत्येक पान पिकले

आयुष्य गोड वाटे हिरव्या तृणांकुरांना!'


सुप्रसिद्ध गझलकार डॉ. स्नेहल कुलकर्णी या अभिजीत यांना अतिशय सुंदर शब्दांत शुभेच्छा देताना म्हणतात , 'अभिदांच्या बऱ्याचशा शेरात आध्यात्मिकता माहेरपणाला(किती सुरेख कल्पना) आलेली दिसून येते. कोणताही बडेजाव न दाखवता त्यांच्या शेरात अध्यात्म चपखलपणे, सहजपणे सामावून जाते. आत्मशक्तीवर अधिष्ठित ही आध्यात्मिकता सर्वसामान्य वाचकांनाही सहजपणे आपलंसं करते. द्वैत-अद्वैत यांच्यात सुसंवादी पूल तयार करते,हे विशेष !'


यापेक्षा जास्त चांगल्या शब्दांत कवीच्या अध्यात्म्यावर कदाचितच कोणी बोलू शकेल.


या संग्रहातील काही शेर तर कधी वेगळी प्रतिके  घेऊन येतात तर कधी एकदम वेगळी कल्पना घेऊन ! काही शेर पाहुयात :


'कथा रामायणाची अन्, भरत लक्ष्मण जुने झाले

अजूनही भावकी सांगे इथे सुग्रीव अन वाली!'


'न्यूटन नियम गतीचा सांगून लाख गेला

बुद्धीस ह्या कुठेपण तुमच्या जडत्व कळते!'


'कोण म्हणते की निराशा हसत नाही ?

प्रेरणेची ती खरी लागवड आहे'


'गेली उन्हे कधीची घेऊन सावलीला

अंधार फार छळतो चल बोलवू उन्हाला!'


'कधीही मी करत नसतो इथे काही' कळे ज्याला

पिपाणी 'मी'पणाची तो कुठेही वाजवत नाही'


गझलनंदा म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुप्रसिद्ध गझलकार प्रा. सुनंदा पाटील यांच्याही सुरेख शुभेच्छा या संग्रहाला लाभल्या आहेत. त्या गझलकाराचे

खालील शेर उद्धृत करतात :

 

'फाटले कापड मनाचे लक्तरे उरलीत काही

भोगतो आहे सुखाने मी विरक्ती भाग्यशाली'

किंवा


'तुझी जी  सावली दिसते तुला आहे

तिला अस्तित्व म्हण केवळ प्रकाशाचे'


असे एकाहून एक वैचारिक शेर

त्याच्या गझलेत येतात. समकालीन गझलकारांपेक्षा

काहीसे वेगळा देणारा हा गझलकार आहे. त्याचा संस्कृतचा व्यासंग आणि विचार हेच या वेगळेपणाच्या

मुळाशी आहेत तर गझलकार अभिजित काळे आपल्या मनोगतात म्हणतात :

'कवितेच्या स्वप्नविश्वातून बाहेर पडून गझलच्या वास्तविक जगात प्रवेश झाला. मनाच्या उद्यानात बागडणारी फुलपाखरे अलगद चिमटीत येऊन  शब्दरूप होऊ लागली ! तिथून सुरू झालेला  प्रवास  मला मनाच्या गूढ गाभाऱ्यापर्यंत घेऊन आला आहे. गझलने दिलेले शब्दलेणे गिरवीत मनाच्या तळाशी असलेल्या कवीने गझल गाभाऱ्यात प्रवेश केला आणि सात्विक तेज असणारा प्रासादिक गाभारा अंतरंगात उजळला '

मला या गझलकाराचे  अजून एक वैशिष्ट्य वाटते ते म्हणजे , ज्यांनी ज्यांनी त्याला गझल शिकण्यासाठी सुधारण्यासाठी मदत केली, त्या सगळ्यांचे ऋण त्याने लिखित स्वरूपात मान्य केले आहेतच पण काळे यांनी कोणाचीही नक्कल केलेली नाही आणि म्हणूनच तो म्हणतो :


'खास नाही,'मन' कुणी सामान्यसा

सत्य हे की मी न कोणाचा 'डमी '!'


हा गझलसंग्रह ,  पिंपरी- चिंचवड मधील 'गझलपुष्प ' या केवळ गझलसाठी काम करणाऱ्या संस्थेने प्रकाशित करावा , यापरिस अजून चांगली गोष्ट कोणती असणार ?  या संग्रहाचे मुखपृष्ठ सुप्रसिद्ध चित्रकार मा. सुरेश नावडकर यांनी सुरेख काढले आहे तर याचे मलपृष्ठ चित्रकार व सुप्रसिद्ध  गझलकार मा.शिवदादा डोईजोडे यांनी सुबक काढले आहे !

हा पूर्ण संग्रह, त्यातील अनेक शेरातील 'गझलीयत' मुळे वाचनीय झालाय असं मला वाटते ! 

अभिजीत आपल्या एका शेरात म्हणतो :


'पोचली जर प्रार्थना ही ईश्वरा कानी तुझ्या

ज्यास जे काही हवे ते सर्व तू मिळवून दे '


सर्व रसिकांच्यावतीने मी  एवढेच म्हणतो,

 'आमीन ! '

....................................................

धनंजय तडवळकर,

पुणे