१.
पोटात एक असते ओठात एक असते
वर्तन असे दुटप्पी, घोडे इथेच नडते
गर्दी सभोवताली असली किती जरीही
म्हणण्यास आपले तर येथे कुणीच नसते
दानास वाटण्याला गरिबास हात ज्याचा
तेथेच रोज लक्ष्मी पाणी सदैव भरते
दिनरात कष्ट करते सांभाळते घराला
थोडाच हात देता गालात गोड हसते
शेती हवी तयांना मुलगाहि नोकरीला
शेतात राबणारा मुलगा कुठे ति वरते
गोरा असो कि काळा मुलगी हवीच गोरी
रंगात सावळीही मुलगी कुणास पटते
टिकतात लग्न येथे समजून एकमेका
जुळतात जन्मगाठी आयुष्य छान फुलते
२.
आहेत लोक येथे मागेच खेचण्याला
वाटेत शूल पेरुन वाटाच रोखण्याला
टाका तुम्ही कितीही चावून घास तोंडी
उलट्या अशाच बोंबा नावेच ठेवण्याला
जपले किती सुनेने सासू नि
सासर्याला
असतात सासरी तर टोचून बोलण्याला
आलाच क्षण कधी तर दोघांत भांडणाचा
थोडाच वेळ द्यावा दोघांस समजण्याला
आनंद जीवनाचा मैत्रीत मानते मी
रागास दूर करते सौख्यात राहण्याला
३.
मला तू ,तुला मी ,अशी साथ होती
घरावर सुखाचीच बरसात होती
कधी वादळे तर कधी ऊन, वारा
तरी आपुली तेवती वात होती
व्यथा अंतरीच्या जरी संगतीला
खुशी आसमंती तरी गात होती
सख्या साथ होती तुझी सप्तरंगी
किती जिंदगी मस्त रंगात होती
भले कष्ट होते तरी सौख्य होते
तुझी सावली पार हृदयात होती
...................................................
अनिसा सिकंदर
ता.दौंड जि.पुणे