१.
एक इच्छा दर्शनाची जागते आहे कधीची
पायरीपाशी तुझ्या रेंगाळते आहे कधीची
तू मलाही वाचतो आहेस हे ठाऊक आहे
पण तुझ्याआधी तुला मी वाचते आहे कधीची
ठेवले आहेत सारे प्रश्न अर्ध्यावर कितीसे
उत्तरांची त्या अपेक्षा भोगते आहे कधीची
सोडली नाहीस जागा घातले कुंपण अनोखे
मी तुझा पत्ता नव्याने शोधते आहे कधीची
समजली नाही तुझी ती वेदना बहुधा तुलाही
तू तिला नाकारल्याचे सांगते आहे कधीची
शेकडो शब्दांस अर्थाचा लळा तू लावणारा
शब्द एकच त्यातला मी मागते आहे कधीची
२.
कितीही होरपळ झाली तरी स्वीकारली आहे
तुझ्यावरचा गडद विश्वास म्हणजे सावली आहे
प्रवासाला कुणाला यापुढे तर न्यायचे नव्हते
तुझी बस आठवण मी सोबतीला आणली आहे
नियम त्याचे, अटी त्याच्या, किती त्याचाच हा अंमल
हवे तेव्हाच डुलणारी मनाची बाहुली आहे
कशाची एवढी चिंता सतावत राहते हल्ली?
कुणाच्या भावविश्वाची दखल मी घेतली आहे?
जगाच्या सोबतीने चालणे ही आपली मर्जी.
म्हणूया आपले कोणास इच्छा आपली आहे
तशा कालांतराने खूपशा सुटतातही गोष्टी
परंतू मी तरी अडगळ करकचुन बांधली आहे
दिसूही देत नाही व्रण कुठे कोणासही आता
अशी मी झूल पाठीवर स्वतःच्या ओढली आहे
३.
वर्तुळातल्या काट्यांवरती अखंड धावत आहे का?
वेळ बदलण्यासाठी कोणी इतके झगडत आहे का?
तुझ्या दिशेने जाताना प्रश्नांची रांगच आढळली.
जे उत्तर तू दिलेच नाही ते मी शोधत आहे का?
मला कुणाशी स्पर्धाबिर्धा करायची नसतेच कधी
तरी जगाला माझ्याबद्दल असेच वाटत आहे का?
एका झाडापाशी हल्ली गर्दी होतांना दिसते
येणाराजाणारा त्याचे अनुभव ऐकत आहे का?
इतक्या लाचारीचे जगणे का स्वीकारत आहे तो?
स्वार्थ साधण्यासाठी, कुठली मर्जी राखत आहे का?
मौन वाढते आहे पण मग मला काळजी का नाही?
आपल्यातले हे अंतर ईश्वर हाताळत आहे का?
बरे वाटते आहे आता तुझा चेहरा बघताना
कुणी तुझ्याही जखमांवरती फुंकर घालत आहे का?
एक दिलासा आहे पण तो धूसर होतो कधीकधी
वा डोळ्यांवर उगाच कोणी पडदा टाकत आहे का?
इतका गोंधळ इतकी तगमग इतकी हतबलता दिसते
तुला द्विधेच्या अधीन होताना मी पाहत आहे का?
....................................................
