Showing posts with label साै.गौरी ए. शिरसाट:. Show all posts
Showing posts with label साै.गौरी ए. शिरसाट:. Show all posts

तीन गझला : साै. गौरी ए. शिरसाट:

 



१.


शोधला नाही बहाणा, टाळण्यासाठी 

घेतले मी दु:ख माथी, माळण्यासाठी 


अर्धवट जाळून गेले सोबती माझे

कोरडे सरपण नसावे, जाळण्यासाठी 


हुंदक्यांना केवढे अडवून ठेवू मी

संमती दे दोन अश्रू ढाळण्यासाठी


नेहमी भेटून सुद्धा मन जुळत नाही

एक क्षण असतो पुरेसा भाळण्यासाठी


फारशी चिंता मला नाही कशाचीही 

बाप आहे ना मला सांभाळण्यासाठी 


रोज तो दिसतो मलाही त्याच जागेवर 

फक्त कारण एवढे रेंगाळण्यासाठी


हात आईचा फिरू दे एकदा पाठी

लेकरू माझ्यातले कुरवाळण्यासाठी 


२.


रित्या राहिल्या ओंजळीत मी दु:ख जगाचे मागत गेले 

माझ्यापाशी जे जे होते सर्वांना ते वाटत गेले


कधी फुलांची तुझ्याजवळ मी केली नव्हती कधी अपेक्षा

मला दिलेल्या काट्यांनाही केसांमध्ये माळत गेले


कधी जोखल्या अनवट वाटा कधी तोडल्या जुन्या शृंखला 

जिथे मिळाली दिशा मनाला तिथे एकटी चालत गेले


मर्जीसाठी तुझ्या कितीदा कुस्करल्या मी माझ्या इच्छा 

रोज रोज मग मनात माझ्या नवे हुंदके साठत गेले


विचार केल्यानंतर कळले पुन्हा परतणे सोपे नाही 

तुझ्या घराचा दुरून रस्ता खिन्न मनाने टाळत गेले 


३.


आधी मवाळ होती पण धारदार झाली

ही लेखणी कशाने आता कट्यार झाली


शब्दांत मांडले मी जेव्हा व्यथेस माझ्या

माझीच वेदना मग हृदयास भार झाली 


गेलास दूर जेव्हा सोडून हात माझा 

तेव्हा कळून चुकले प्रेमात हार झाली


जन्मास लेक आली सारी सुखे मिळाली

नात्यास जोडणारी अलवार तार झाली 


होऊन स्वार आले लाटेवरी पुन्हा मी

अन् वादळात माझी नौकाच पार झाली 

...................................................