देत समृद्धी किनारी चालणारी तू नदी
घेत कचरा सोबतीला वाहणारी तू नदी
वाघिणी तू या युगाची, स्वामिनी तू या जगी
घालते जखमास फुंकर, तारणारी तू नदी
आदिशक्ती तू जगाची, गर्जते सौदामिनी
दानवांवर मात करता, फाडणारी तू नदी
या धरेची तूच माता, माउली विश्वात तू
मखमली शालू जसा का , वाटणारी तू नदी
तू यशोदा, कल्पना तू , वैभवी अन् रागिणी
छेडताना प्रीत त्यावर, भाळणारी तू नदी
तू अमावास्या धरेची, पौर्णिमाही तूच तू
तूच संस्कारी रुढींना पाळणारी तू नदी
निर्भया अन् चंचला तू , वाहते पण एकटी
साधण्याशी ध्येय, पल्ला गाठणारी तू नदी
..................................................
आलियागोहर जाकीर शेख, धुळे