१.
आटून सर्व गेले, हे पूर आसवांचे
कुठवर सहन करू मी, हे दुःख वंचनांचे
आवाज वेदनांचे, दाबून टाकले मी
माझ्या मनात लाखो, कल्लोळ भावनांचे
सांगा कुणीतरी हो, बेधुंद नाचऱ्यांना
सोडू नका ठसे हे, बेताल पावलांचे
दुःखास अंत नाही, कळले कधीच होते
शोधून ना मिळाले, आरंभ त्या व्यथांचे
सांगू कसे मनाला, समजूत व्यर्थ आहे
अवचित लगाम सुटती, बेफाम आठवांचे
माया कधी जगाने, नव्हतीच फार केली
उपकार मानते मी, त्या सर्व ठोकरांचे
तू आरसा मनाचा, माझ्या कधीच नव्हता
होते सभोवताली, आभास सावल्यांचे
२.
नेत्र माझे वाचताना दाटले होते
पत्र अश्रूंनीच सारे फाटले होते
रंग नाही याचसाठी रूसली होती
त्या फुलांना गंध त्याने वाटले होते
तो मनाला टोचणारे बोलला होता
मात्र कंठी शब्द माझे दाटले होते
एवढा का पूर नयनी आज आलेला
कोणते आभाळ त्यांचे फाटले होते?
उंच अंबर मोकळे तिजला जरी होते
झेप घेता, पंख का हो छाटले होते?
....................................................
