Showing posts with label प्रा.बी.एन. चौधरी. Show all posts
Showing posts with label प्रा.बी.एन. चौधरी. Show all posts

तीन गझला : प्रा.बी.एन. चौधरी

 



१.

करतो विचार आहे, लाचार माणसांचा,
देशास भार झाला, मुर्दाड माणसांचा.

राहील काय मागे, शिल्लक अता कुणाला,
जमला जमाव येथे, खादाड माणसांचा.

जो सावरून होता, ज्ञानी जमाव मोठा. 
झाला गुलाम तोही, बेताल माणसांचा.

सौंदर्य खानदानी, जेव्हा पुढ्यात येते ,
देऊ कसा भरोसा, चवचाल माणसांचा.

उच्छाद फार झाला, का सोसतात शिक्षा,
ठेचा खुशाल टेंभा, नाठाळ माणसांचा.

भक्तास दास करुनी, बिंधास्त जीव घेती ;
धोका कसा सहावा अपुल्याच माणसांचा. 

द्यावा न त्यास थारा, ना सोबतीस घ्यावे ;
आदेश पाळतो जो लाचार माणसांचा.

गुणगाण रोज गावे, त्यांना सदा पुजावे ;
सहवास नित्य घ्यावा विद्वान माणसांचा.

२.

निष्ठा लिलाव झाली, स्वार्थी मुजोर हाती,
खुर्चीपुढे कुणाची, टिकली न आज नाती.

बघ मुखवटे गळाले, लाचार माणसांचे,
अन् शर्मसार झाली, इथली पवित्र माती.

स्वार्थास पाय फुटले, नेते लबाड झाले,
पक्षास पळविती ते, देशास रोज खाती.

बापास सांगती जे, आम्हीच बाप तुमचे,
देती प्रमाणपत्रे, फाडून घेत छाती.

अंधार दाटलेला, आहे सभोवताली,
वैरी बनेल वारा, ठेवा जपून वाती.

३.

तिच्या पालकांनी, तिचा घात केला,
बिचाऱ्या भृणाचा, फुका जीव गेला.

किती धावला तो, धराया सुखाला,
अखेरी निघाला, रिकामाच पेला.

गुरुंची करे जो, उगा रोज निंदा,
असा धूर्त-ढोंगी, नको नीच चेला,

जसा कृष्ण जख्मी, कळे द्रौपदीला,
झणी फाडला तो, तिने खास शेला.

मतीमंद झाले, महाभाग नेते,
महाराष्ट्र माझा, तळालाच नेला.

फसविले जगाला, किती लोभ केला,
न हातात उरला, तरी एक धेला.

न काटे न शत्रू, न डाकू न वैरी,
सुगंधी फुलांनी, बघा घात केला.

सुखाच्या क्षणांना, स्मरावे गुणावे,
गुफावा सुखाचा, अभावात झेला

.................................
प्रा.बी.एन.चौधरी.
देवरुप, नेताजी रोड.
धरणगाव
जि. जळगाव. ४२५१०५
९४२३४९२५९३