१.
काय फरक पडतोय जगाला कुणी कसे घर चालवले
पण माझ्या सगळ्या इच्छांवर मी बुलडोझर चालवले
त्यांना माझ्या दुष्काळाचा कंटाळा तर येणारच
ज्यांनी कवितेमध्ये गुलाब अन् गुलमोहर चालवले
जन्म आणि मृत्यूच्यामध्ये, एका श्वासाचे अंतर
फुकट मला या आयुष्याने इतके अंतर चालवले
जगण्यासाठी भक्तीचा व्यवसाय चांगला होता पण
कोणी ईश्वर चालवला तर कोणी पत्थर चालवले
फुलांभोवती भिरभिरणे इतकाच गुन्हा होता त्याचा
आणि खुनाचे दुनियेने खटले भुंग्यावर चालवले
चांगदेव माझ्यामधलेही आले होते वाघावर
मग माझ्या गझलेने माझे अक्षर-अक्षर चालवले
२.
सगळे पक्षी सापडले चिमणी सापडली नाही
ही गोष्ट सांगण्यासाठी आजी सापडली नाही
मृत्यूस आडवे आले आईचे पुण्य कदाचित
बापाला वेळेवरती दोरी सापडली नाही
दंगलीत सुद्धा माझे सुखरूप राहिले घरटे
कारण त्यांना दारावर पाटी सापडली नाही
गावाकडच्या झाडाची तर मुळे खोलवर गेली
शहराकडच्या झाडाला माती सापडली नाही
यंदाही त्याच्या राख्या हिरमुसून गेल्या कारण
दादा सापडला नाही ताई सापडली नाही
माणूसपणाचा माझ्या उच्चांक कसा ठरवावा
मोजून पाहिली पण ती उंची सापडली नाही
त्याला ममतेचा पाझर फुटणार कधीही नाही
ज्याला बाई सापडली, आई सापडली नाही !
३.
माणूस पाहुनी आले भित्रेपण या झाडाला
बिलगून उभे राहूया सारेजण या झाडाला
जे झाड लावले होते ते खूपच मोठे झाले
पण कुणी शिकवले नाही मोठेपण या झाडाला
ओझ्याने फुलाफळांच्या कायम झुकलेला असतो
किंचितही शिवले नाही हे मीपण या झाडाला
सगळ्या बाजूने त्याने सारखी ठेवली छाया
कळणार कसे डावे अन् उजवेपण या झाडाला
ही अवघी पृथ्वी त्याचे माहेर वाटते आहे
ना कुंपण या झाडाला ना अंगण या झाडाला
बाबा झाल्यावर जपतो ओलावा मातीमधला
आई झाल्यावर येते हिरवेपण या झाडाला
...................................................
एजाज शेख (पुसदा) अमरावती
ह. मु. अकोला