१.
संपवण्याचा डाव आखला जातो
यासाठी इतिहास बदलला जातो
इंद्रधनू म्हातारे झाले आहे
आता नुसता रंग शिकवला जातो
धर्म आपला करण्यासाठी मोठा
माणुसकीचा गळा घोटला जातो
अंधाराला गुरू मानले जाते
इतक्यासाठी सूर्य लपवला जातो
व्यवस्थेतले प्यादे बनलो आपण
पण कर्माचा खेळ खेळला जातो?
तुम्ही भले रंगांची धरणे बांधा
आपआपला रंग वळवला जातो
ध चा म तर आजही नव्याने होतो
हुकुमाखातर शब्द बदलला जातो
२.
'तू ' संपलास जेव्हा दुनिया म्हणेल सारी
घे तू फिनिक्स होउन राखेतुनी भरारी
त्यांची मधाळवाणी विश्वासघात करते
प्रत्येक पावलावर मिळतील हे शिकारी
ते सरकतील मागे वादात ऐनवेळी
चाणक्य होउनी तू समजून घे हुशारी
ज्यांना तुझा पराभव होता हवाहवासा
हतबल करून दे तू त्यांच्या मुखी तुतारी
दिसते विषण्णता का डोळ्यात सांत्वनाच्या
त्यांचे मधूर सांत्वन का भासते दुधारी?
३.
मन हळवे होते म्हणून फसले होते
मी ग्रीष्मालाही वसंत म्हटले होते
पाण्यात तुझे प्रतिबिंब पाहिले जेव्हा
मी डोहामध्ये प्राण त्यागले होते
फसव्या काट्यांनी मी तर जखमी झालो
ती फुलेच असतिल असे भासले होते
बेरंग कसा झालो ते कळले नाही
मी चित्र तुझे रंगीत बनवले होते
मी अवकाशाचा तारा सुंदर होतो
पण इच्छेखातर मला पाडले होते
नाजूक भासले फूल तुला हे व्वा व्वा
जे फूल मला आजन्म पोळले होते
विश्वास कधीही नव्हता प्रेमावरती
पाहुनी तुला मन कसे बदलले होते?
कुठलाच उतारा लागू नाही पडला
मी डोळ्यांमधुनी काय प्राशले होते ?
मैफिल कवितेची नशाच चढवत गेली
काव्याचे हळवे थेंब मिसळले होते...
ही हवा नशीली उगीच झाली नव्हती
ओल्या केसांनी मद्य उडवले होते?
.................................................
डॉ.राज रणधीर
जालना
