Showing posts with label प्राजक्ता पटवर्धन. Show all posts
Showing posts with label प्राजक्ता पटवर्धन. Show all posts

तीन गझला : प्राजक्ता पटवर्धन

 



१.


नाव काढले तुझे कुणी तर आत आत होते पडझड 

ना दाखवता येते ती अन् लपवता कुठे येते धड? 


रमे पाखरू पिंजऱ्यामधे शीळ घालते अधुनमधुन 

हात पसरुनी अंबर वेडे त्याला म्हणते दार उघड 


गर्द सावली धाव धावली आणि म्हणाली सूर्याला 

ढगांमधे लपतोस अताशा.. तुझी बदलली का आवड?


तुझ्या गावचा वारासुद्धा कुठे राहिला अनोळखी?

कुठे वाहतो कसा वाहतो कळणे हे नाही अवघड 


बरेच काही केले असते सोबत चालत असतो तर

पुढे नि मागे करण्यामध्ये कुठे मिळाली सांग सवड?


पक्षी पाने फुले भरूनी विणायचे होते जीवन

सुखदुःखाच्या सुइधाग्याची घालता न आली सांगड 


विषय तुझा निघताच आपसुक नजरा वळती माझ्यावर

मूकपणे त्या अपुल्याबद्दल बोलतात मग उघडउघड 


२.


तिऱ्हाइतागत मला पाहुनी निघून गेला 

एक जुना पाऊस घराच्या वरून गेला 


आकाशाचे वेड खुणावत होते त्याला 

राघू माझ्या पंखाखालुन उडून गेला


पदर लहरला गंध ओळखीचा दरवळला

तुझ्या गावचा वारा बहुधा इथून गेला


दुःख वेदना राग लोभ अन् आनंदाच्या 

पंगतीतुनी नकळत संयम उठून गेला 


किती वेगळी भेटत गेली जगी माणसे 

हरेक आला अनुभव, झोळी भरून गेला


नाव नसावे माझे त्याला आवडलेले 

म्हणून सागर येत किनारी पुसून गेला


टाळत गेले, टाळत गेले, पूर्ण टाळला..

क्षण मोहाचा जेव्हा माझ्या पुढून गेला


स्वप्नकळ्या अलवार उमलल्या मनामधे अन् 

सरसावत त्या काळ येउनी खुडून गेला 


३.


तू जशी होतीस आधी आजही आहेस का? 

आपसुक येते मनी जे तेच तू लिहितेस का?


कल्पना भरपूर होत्या शब्द होते तोकडे

आपले पहिले दिवस कविते, कधी स्मरतेस का?


वेगळे झालोच असतो शेवटी आपण... तरी

तू मना बुद्धीकडे नेलीस अपुली केस का?


मी तुझ्यासाठी स्वतःला टाकले बदलून अन् 

तू पुन्हा म्हणतोस, पूर्वीसारखी नसतेस का?


कोणती आहे सरळ अन् वाकडी कुठली, कशी

आखणाऱ्याला कळे, कळते कधी रेषेस का?


वाट झाली डांबराची अन् कदाचित यामुळे 

ढासळत गेली अचानक गावची त्या वेस का?


एकमेकाशी पटत नाहीच आता आपले 

जीवना, जाहीर करुया ; बोलवू मी प्रेस का?


वेदना विसरायला मी मैफिलित बसले पुन्हा

सांग पण मदिरे, तशी तूही अता भिनतेस का?

...................................................