१.
कुठे धरती कुठे अंबर..बघू नंतर
किती दोघांतले अंतर.. बघू नंतर
कुणाला लागली घरघर.. बघू नंतर
कुणाची चालली मरमर.. बघू नंतर
कुणी भरली इथे घागर... बघू नंतर
कुणाचा आटला सागर... बघू नंतर
इथे झाले कुणी बेघर.. बघू नंतर
कुण्या दारी किती झुंबर..बघू नंतर
मला ना भेटला आदर.. बघू नंतर
कुणाची केवढी चादर... बघू नंतर
जरी झालेच मन जर्जर.. बघू नंतर
स्मृतींचे साचलेले थर... बघू नंतर
२.
शेवटी काहीच नाही बोलता आले मला
हात हाती घेतला अन् स्पर्श बोलू लागला
रात्र नव्हती, चंद्र नव्हता आणि नव्हत्या तारका
त्याच ओढीने पुन्हा मग रातवाही बरसला
एक इच्छा का पुन्हा निसटून जाते सारखी
एक फुंकर घातली अन् एक तारा निखळला
जायचे आहे तसेही त्याच वाटेने पुढे
वाट नाही ओळखीची आणि चालू लागला
दूर होता चंद्र तेव्हा जवळ होता काजवा
हे असे ठरवू कसे मी कोण आहे आपला
वाहवाही होत गेली.. शब्द होता वेदना
हा कुणाच्या मिळकतीवर शेर लिहिला चांगला
३.
निश्वास पाकळ्यांचा कळलाच ना कधी
अन् हुंदका फुलांना फुटलाच ना कधी
आलेत मेघ काळे तेही अधांतरी
पाऊस मोसमाचा पडलाच ना कधी
राधेत पाहिला अन् मीरेत पाहिला
पण भाव रुक्मिणीचा दिसलाच ना कधी
निवडू नकोस आता तू रंग वेगळा
जो रंग ओळखीचा विरलाच ना कधी
चकव्यात अडखळे का पाऊल हे पुन्हा
येऊन जर ठिकाणा वळलाच ना कधी
देऊ कसा पुरावा अन् कोणता तुला
जर चंद्र पौर्णिमेचा हसलाच ना कधी
ओवीमधून सजला जो केशरी टिळा
तो गंध चंदनाचा लपलाच ना कधी
...................................................