१.
बंद झाल्या जर व्यथांच्या येरझारा
वाटतो होइल कमी मग कोंडमारा
चूक केली जन्मभर एकच कितीदा
की चुकांचा आवरत बसलो पसारा
वाटणी केली घराची खण निवडले
वाटला बहुतेक हक्काचा दरारा
चालली वाढत व्यथांची बंडखोरी
चालला मागे व्यथांच्या जन्म सारा
मी मला कळलो कुठे तितका पुरेसा
का उगा म्हणवू स्वतःला ध्रुवतारा
एकटे असतो किती आतून आपण
फक्त नावालाच नात्यांचा सहारा
२.
राहते काट्याविना का मन सलत
राहते काही निराळे जाणवत
दु:ख जितके जास्त येते सोबती
राहतो का चेहरा तितका हसत
दु:ख माझे सांगवत नाही मला
अन् कुणाला हाल नाही दाखवत
भावनांचे रंग घेउन का बरे
जीवनाचे चित्र बसलो रंगवत
सांज कात्री का सयींची आणते
आणि बसते जीव माझा कातरत
का स्वतःची चीड येते नेहमी
का स्वतःला मीच नाही आवडत
३.
का मनाचा सारखी करतेय छळ
का उदासी सारखी येते जवळ
का उगा नाती जपत मी राहिलो
एकटेपण जर मना होते अटळ
काळजी वरवर नको माझी करू
शक्य झाले तर मनाचा गाठ तळ
आसवे का ढाळतो आहेस तू
शेवटी दुखतील दुखणारेच वळ
मार्ग निवडावा स्वतःचा तू सतत
थोडक्यापुरते जगाचे पाठबळ
कल्पनांचे ऊन लागत राहते
भावनांची होत असते पानगळ
त्यातही फिरती व्यथांचे भोवरे
डोह स्वप्नांचा कुठे असतो नितळ
.................................................