Showing posts with label सौ. दीपाली महेश वझे. Show all posts
Showing posts with label सौ. दीपाली महेश वझे. Show all posts

तीन गझला : सौ. दीपाली महेश वझे

 



१.

काय लपवले आत मनाच्या दाखव आता
ओघळलेले कागदावरी पाठव आता

बिलग जरासा मुक्या मनाला मनापासुनी
बांध मनाचा उसळत आहे वाचव आता

किती आरसा केविलवाणा दिसे मनाचा
नाव मुखातच राहिले तुझे 'माधव ' आता

स्वप्न पडावे खोटे क्षणभर जगण्यासाठी
घर प्रेमाचे शिंपत आहे, सारव आता

धीराचे बघ घोट प्यायले मगापासुनी
तहान होती तशीच आहे, भागव आता

२.

ना नको काढू सख्या फांदीवरी ते छान दिसते
बघ सुखाचे रान करण्या हेच पिवळे पान असते

याच फांदीवर सुखाचा थेंब झरलेला असावा
पण उमलत्या पाकळ्यांना तेवढीही जाण नसते

गात जावे दुःख जेव्हा कोणतीही आस नाही
कोकिळाही कंठ फुटता भावनांना गात बसते

फार झाले वार थोडे श्वास घेऊ दे मलाही
आत विझलेल्या दिव्याची तीच जळकी वात हसते

मोकळ्या केल्यात काही या मनातच राहिल्या पण
रोखलेल्या वेदनांची नाळ बहुधा आत डसते

३.

भाव मोजके आधाराचे डोळ्यात सख्या भरून घ्यावे
भाव सोहळे आयुष्याच्या वहीत आता लिहून घ्यावे

संसाराच्या उंबऱ्यात बस मर्यादेचा मंत्र जपूया
व्रत-वैकल्य परंपरा ही निभावयाची शिकून घ्यावे..

अवाढव्य त्या वटवृक्षाला गुंडाळत जा सूत नेमके
संयमातले बोध घेउनी अहंपणाला शिवून घ्यावे

आयुष्याची रेष आखली आहे मीही मनासारखी
सख्या वाटते आयुष्याचे क्षण सोनेरी करून घ्यावे

पडलेल्या मज प्रश्नांचे तर उत्तर एकच खरे वाटते
माणुसकीचा ग्रंथ होउनी अवघे जीवन तरून घ्यावे

..................................................
सौ. दिपाली महेश वझे,

बेंगळूरू

मो. 9714393969