१.
प्रीत सरींनी तिने भिजवले अन् कवटाळू लागली
एक अनामिक इच्छा मनात मग शेवाळू लागली
तिच्या मनाच्या डोहामध्ये खळबळ दिसते आगळी
म्हणून बहुधा नजरेलाही माझ्या टाळू लागली
जाईसोबत करू लागला जेव्हा सलगी मोगरा
केसांमध्ये तीही अपुल्या गुलाब माळू लागली
जितका उशीर तितके चुंबन एक नियम हा ठेवला
तरी कुठे ती भेटायाच्या वेळा पाळू लागली?
संस्काराचा जिभेस चटका तिच्याही दिला असावा
म्हणून इच्छा घुसमटलेल्या आतच जाळू लागली
रहस्य कळले उचकीचे पण उशीर झाला केवढा!
ती माझ्या सरणावर आता अश्रू गाळू लागली
तळ्यात बुडले पाडस अन् हरिणी आक्रंदू लागली
एक मगरही काठावर मग अश्रू ढाळू लागली
२.
फार खुबीने शब्दांचा मी वापर करतो
त्यामुळेच वैरीही माझा आदर करतो
प्रेयसीतली राधा जेव्हा जागी होते
माझ्यामधला मी जागा मुरलीधर करतो
तिला कळावा निरोप माझा इतक्यासाठी
हृदयामधल्या ओढीचे मी कबुतर करतो
काकणभरही मला दिले जर प्रेम कुणीही
परतफेड मग मीही त्याची मणभर करतो
कुणास दिसते उसात केवळ मळी सुरेची
कुणी गूळ तर कुणी उसाची साखर करतो
बळी .एवढा नसेल कोणी वेडा येथे
फसतो तरिही दरवर्षी तो वावर करतो
जरी वाहवा मिळवत असतिल माझ्या गझला
पण मी माझी ग्लानी त्यातुन सादर करतो
३.
भिंत न तोडू शकलो आम्ही जातीधर्माची
मी मग झालो दुसरीचा अन् तीही दुसऱ्याची!
रुमाल उचलुन तिला दिला इतके कारण झाले
माझ्यावर मग पाळी आली डोळे पुसण्याची
माझ्या फांदीवरचे घरटे सोडुन गेली ती
त्या मैनेला सवय असावी झाड बदलण्याची!
तिने खुबीने वापर केला होता केसांचा
मुळीच नव्हती खूण ठेवली गळा कापल्याची
हृदयपाकळ्या विखरून गेल्या तिच्या प्रहाराने
फुले सोडुनी संगत करतो आहे काट्यांची
...................................................