१.
धावत असतो या जगण्याच्या पाठी आपण
असे लागतो आयुष्याच्या हाती आपण
बालपणीची आदत जातच नाही लवकर
खातो मोठे झाल्यावरही माती आपण
गोष्ट कधीही सांगत नाही आई अपुली
आणू दादा आश्रमातून आजी आपण
तुझी वेदना जाळत आहे मनास माझ्या
त्याच गावच्या बाभळी आणि बोरी आपण
जमवत असतो महिन्याभरचा जमा खर्च अन्
मनात घेतो आवडणारी साडी आपण
आठवणीचे वलय उमटता हृदयामध्ये
सांडत असतो नदीत खारे पाणी आपण
भोवतालचे दुःख वाटते, खली सारखे
त्याच्यासोबत खेळत बसतो कुस्ती आपण
२.
जगण्यासाठी झांज,ढोलकी, बाजे आले
माझ्या हाती वेदनेचे तुणतुणे आले
हलकेफुलके जीवन होते बालपणीचे
मग इच्छेने पाठीवरती ओझे आले
भेट न झाली केव्हा जर हाता-तोंडाची
सांगत असते मी पोटाला रोजे आले
रोप लावले गुलाब, जाई, शेवंतीचे
हाती माझ्या निवडूंगाचे काटे आले
माती त्याला साद निरंतर घालत होती
पण वांझोटे उत्तर आभाळाचे आले
जुळून आला योग आपल्या भेटीचा पण
किती त्यातही टोल, हायवे, थांबे आले
त्रास वाढला देशात मुघल साम्राज्याचा
ढाल होऊन माझे शिवबा राजे आले
३.
नदीवर वेदना अलगद उभी आहे
तिच्या डोळ्यांत दुःखाची नदी आहे
जराशी वाट चुकली चालताना अन्
पुढे रस्त्यात दलदल लागली आहे
कशी बेरंग झाली जिंदगी सारी
तिच्या हातावरी मेंदी नवी आहे
सुरू नात्यात आहे रोजची घसरण
किती आपूलकी शेवाळली आहे
घराचा सापडे ना कोपरा माझ्या
मनाची हरवली मी ओसरी आहे
तिला मी पाहिले वळणावरी येथे
मला सोडून मागे चालली आहे
जसा झाला अचानक बंद दरवाजा
तशी इच्छेस चावी लागली आहे
कशी येऊ तुला भेटायला आई
कुठे कात्रज, कुठे अमरावती आहे
...................................................
