१.
जिंकण्यासाठी लढाई फार झाली
आसवांची ही कमाई फार झाली
जन्म गेला वादळांशी झुंजताना
संकटांशी दिलजमाई फार झाली
शेर माझा ना कधी पटला कुणाला
ही निरर्थक वाहवाही फार झाली
दुःख छळते सारखे हे पापण्यांना
वेदनेची ही बढाई फार झाली
टांगला मी देह अन् हा मुक्त झालो
जीवनाची सरबराई फार झाली
२.
माणून,धर्म, जाती सारेच बाटलेले
येथे अहंपणाने सारेच व्यापलेले
वस्तीमधून जेव्हा जाईल प्रेत माझे
होतील सैल अश्रू डोळ्यांत साठलेले
उधळू नका कुणीही प्रेतावरी फुलांना
संघर्ष जीवनाचे आधीच सोसलेले
आली तुला कशी ना थोडी कदर कुणाची
इतके असू नये हो काळीज आटलेले
करता उगाच कावा माणूस सापडेना
उघडा तुम्हीच मन हे तुमचेच झाकलेले
३.
वैर सांभाळून जगलोॆ जन्मभर
अन् जिभेवर ठेवले होते जहर
ना कधी कुचकारली पानेफुले
त्यामुळे काट्यासही आली कदर
जीवनाची चालतेॆ वणवण किती
स्वप्नही जळतेॆ दिव्यासम रात्रभर
पोटतिडकीने किती सांगूनही
होत नाही फारसा काही असर
मोल घामाचे सहज कळते कुठे
एकदा शेतात थोडा धर वखर
....................................................
शरद काळे
धामणगांव रेल्वे