Showing posts with label मीनाक्षी गोरंटीवार. Show all posts
Showing posts with label मीनाक्षी गोरंटीवार. Show all posts

तीन गझला : मीनाक्षी गोरंटीवार

  

 


१.

खोल तळाशी ठाण मांडुनी बसते इच्छा 
आशेवरती ,सुप्त मनाची जगते इच्छा 

व्यास न त्रिज्या व्यापुन घेते परीघ सारा 
केवळ एका अंशात कुठे फिरते इच्छा

जोवर असतो देठ कोवळा फार मनाचा 
तोवर अलगद फांदीमधुनी झुलते इच्छा

नकोस आता चित्र मना रंगवू सुखाचे
अश्रूंमध्ये वाहत जाउन विरते इच्छा

आत्मा जातो देह सोडुनी परलोकी पण 
त्याच्या मागे सदैव त्याची स्मरते इच्छा 

हवे तेवढे गुपचुप अपुले पाय पसरते
वास्तव सोडुन स्वप्नामध्ये रमते इच्छा

विवेक सुटतो पाय घसरतो वाटेवरती
मोहाच्या मग दलदलीमधे फसते इच्छा 


२.

भले झाले कुणाचे सांग रागाने
जगाला जिंक तू निष्काम प्रेमाने

मनाने चालते मी वाट वारीची
इथे आहे तशीही फक्त देहाने

कशी मुक्ती मिळावी सांग देहाला
मनाला ग्रासले जर का विकाराने 

स्वभावाने कधी कोणी बदलतो का?
उगा देऊ नये सल्ला शहाण्याने

तसेही व्यक्त होणे टाळते हल्ली 
फुकटचा वाढतो मग वाद वादाने

कुठे पूर्वीप्रमाणे राहते काही 
इथे जीवन बदलते फार वेगाने

किती घायाळ झाले, खाकही झाले
तुझ्या एकाच नजरेच्या इशाऱ्याने

३. 

वेदनेला उरी मुरव आता
दु:ख गझलेत तू सजव आता

भोग कोणासही चुकत नाही 
सत्य हे अंतरी भिनव आता

सांग थांबू किती तुझ्यासाठी 
एक होकार बस कळव आता

जीव जडला तुझ्यावरी माझा
प्रीत ही कोंदणी जडव आता

दु:ख हृदयी दडव खुबीने अन् 
हास्य ओठांवरी फुलव आता

प्राक्तनाने सदैव नाचविले 
हाच कित्ता उलट गिरव आता

जन्म अनमोल मी दिला पोरा
जीवनाला तुझ्या घडव आता

या जगाने दिले किती अनुभव 
शेर सुंदर नवे प्रसव आता

मोह-मायेत बघ मिनू रमते
या मनाला विठू वळव आता

....................................................