Showing posts with label अर्जुमनबानो शेख. Show all posts
Showing posts with label अर्जुमनबानो शेख. Show all posts

तीन गझला : अर्जुमनबानो शेख

 




१.


झाकणे अपुलेच सगळे ही सवय त्यांची

पाडणे दुसऱ्यास उघडे ही सवय त्यांची


धोरणी असला कुणी जर त्यास नमवाया

खेळणे नित डाव फसवे ही सवय त्यांची


बोलतो अन् ठेवतो जो बोट मर्मावर

दाबणे झटक्यात नरडे ही सवय त्यांची


घडविणे इतिहास त्यांना शक्य नाही पण

काढणे उकरून मुडदे ही सवय त्यांची


कष्ट ते येवोत कोणाचे फळाला पण

गवगवा अपुलाच करणे ही सवय त्यांची


आणतो जेरीस जेव्हा धाक ईडीचा

चाटणे मग पायतळवे ही सवय त्यांची


२.


मुठीत नभ हे धरायला चल जाऊ आपण

सरीत ओल्या स्वैर मोकळे नाचू आपण


कोरड पडली जगास येथे केव्हाची ही

मायेची ती ओल जराशी पेरू आपण


असे करू की फुटेल पाझर पाषाणाला

वसुंधरेचे गीत नव्याने गाऊ आपण


सभोवताली कसा विषारी वारा फिरतो

जळाथळाला श्वास निरामय देऊ आपण


कोलाहल हा असा माजला वादंगाचा

शांतिपथाचा मुक्त पारवा सोडू आपण


पहा घसरली मुल्ये सारी मानवतेची

बुद्धाचा संदेश नव्याने वाचू आपण


भयाण कर्कश जिवघेणी ही शहरी वर्दळ

एक कोपरा एकांताचा शोधू आपण


पोरांसाठी ज्या बापाचा कणा वाकला 

दैवतास त्या मनगाभारी स्थापू आपण


मेंदूचीही लाही करते उष्ण झुळुक ही

सौजन्याची ओजस चादर ओढू आपण


३.


द्वेष मिटवुनी रडशील खरा मी नसल्यावर

दुःख विसरुनी होशील बरा मी नसल्यावर


गार झुळुकही उष्ण वाटते हल्ली तुजला

साहशील मग ही तप्त धरा मी नसल्यावर


हसतेस किती, म्हणतोस मला चिडून आता

शोधशील मग गाव हासरा मी नसल्यावर


तुच्छ जरीही मानतोस तू आज वयाला

झुकेल बांधा, येईल जरा मी नसल्यावर


सागरापरी जेव्हा तेंव्हा खवळतोस पण

शांत, संयमी होशील झरा मी नसल्यावर


....................................................

अर्जुमनबानो शेख,

बल्लारपूर, जि.चंद्रपूर

मो.8055947453